आम्ही बाप दाखवा...नाही तर श्राद्ध करा....

या प्रकारची सत्य आणि रोखठोक पत्रकारिता करतो म्हणून हिमायतनगर (नांदेड) च्या काही तथाकथित (उपटसुम्भ्या) पत्रकार, वार्ताहराची जळते आहे. आमच्यामुळे काहींच्या दुकानदा-या बंद झाल्या म्हणून ते आम्हाला पाण्यात पहातात. मी आयुष्यात कधीच दारू पित नाही, नॉनव्हेज मला आवडत नाही, मावा, गुटखा, सिगारेट आदी व्यसनापासून दूर आहे. रात्री कोणाच्या पार्टीला जात नाही, मग पार्टीसाठी जावून मार खाणारे व लोळणारे तथाकथित आमच्या माघारी टिंगल टवाळी करीतच असतात. दुस-याकडे एक बोट दाखविताना स्वत:कडे चार बोटे असतात, याचा त्यांना विसर पडतो. दुस-याचे कुसळ दिसते, मात्र स्वत:चे मुसळ दिसत नाही, अशा माकडछाप पत्रपंडितांकडे आम्ही लक्ष देत नाही.
मी आजपर्यंत कोणत्याही पत्रकाराचे बॅनर म्हणजे वृत्तपत्र काड्या करून हाती घेतले नाही.प्रत्येक वेळी मी शहरात नविन बॅनर आणले आहे. दैनिक देशोन्नती, दैनिक पुण्यनगरी, लोकपत्र, गोदातीर, दैनिक श्रमिक एकजूट, दैनिक लोकाशा, देवगिरी तरुण भारत, सर्वजन, दैनिक भास्कर, दैनिक पुढारी, दैनिक सामना, उद्याचा मराठवाडा, दिव्य मराठी, गांवकरी असे किती तरी नविन बॅनर आणायचे, ते लोकप्रिय करायचे मात्र चुगल खोर पत्रपंडितांनी गुप्त काड्या करून माझे बॅनर काढून घ्यायचे हा सिलसिला माझ्यासाठी काही नवा नाही. हलक्या कानाचे मालक आणि धंदेवाईक संपादक, आवृत्ती प्रमुख असल्यानंतर आणखी दुसरे काय..? घडणार..?

आलेल्या अनुभवावरून मीच माझे बॅनर बनविले, त्याचे नाव आहे - नांदेड न्युज लाईव्ह. हे बॅनर तर कोणी काढून घेवू शकत नाही... सात वर्षापासून अखंडपणे आमची लेखणी तळपत आहे. मध्यंतरी एका शेतकर्यास न्याय मिळून देण्यासाठी केलेल्या प्रत्नातून ५ लाखाची लुबाडणूक करणाऱ्या एका शिक्षकाने कोर्टात केस दाखल केल्याने खचलो होतो, परंतु हि केस आता संपुष्ठात येण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पुन्हा नव्या दमाने लेखणी सुरू केली आहे. जे खरे (सत्य) आहे, ते सडेतोड मांडतो. जनतेची बाजू घेतो, नेत्यांची नाही. जे खिसेभरू असतात, तेच नेत्यांच्या चपला उचलत असतात. ते काय आणि कसे लिहितात, हाही संशोधनाचा विषय आहे. त्यांनी स्वत:च्या पोटा पाण्यासाठी लेखणी हाती घेतली आहे, आम्ही नाही. मी पत्रकारिता जॉब म्हणून नाही, एक चळवळ म्हणून करतो. मागील ४वर्षात एकही केस झाली नाही, त्यामुळे विश्वासाहर्ता जपल्याचे सांगणारी जनता हाच आमच्यासाठी पुरावा आहे. सुदैवाने १३ राज्यात ४४ आवृत्त्या असलेल्या भास्कर मध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. अकोला औरंगाबादहून भास्कर सुरू होवून, 06 वर्षे झाली, तेव्हापासून काम करतो, पण कधी प्रपोगंडा केला नाही. नांदेड न्युज लाईव्ह हेच माझे खरे बॅनर आहे आणि ते कायम राहणार. मग असे कितीही तथाकथित पत्रपंडित जळफळाट करो. 

राजकीय पुढा-यांच्या संगतीत राहून काही पत्रकार राजकारणी झाले आहेत. नांदेडला दोन वेगवेगळे पत्रकार संघ झाले आहेत. तोच प्रकार सध्या हिमायतनगर मध्ये असून, त्यातही दोन्ही संघात दोन - तीन गट आहेत. यात बोटावर मोजण्याऐवढेच खरे पत्रकार उरले असून, ज्यांना चार ओळी लिहिता येत नाही, नेहमीच दुसर्यांची कॉपी मारतात, दलाली व राजकीय नेत्यांच्या भोवताली फिरतात अशांना सदस्य करून आलेला वाटा घेण्यासाठी कार्यरत आहे. जे खरे पत्रकार आहेत, पण त्यांच्या विरोधात आहेत, त्यांना सदस्य केले जात नाही. मांजराच्या गळ्यात घंटा कोण..? बांधावी अशी परिस्थिती हिमायतनगर येथील असून, काही विशिष्ठ लोकांची मक्तेदारी असल्याने कोणत्याही कार्यक्रमात पुढे पुढे करून आपल्याच नावाचा गवगवा करणे व दुसर्यांना पाण्यात पाहणे हाच धंदा त्यांनी सुरु केला आहे. दुस-यासाठी खड्डे खोदले की, एक दिवस स्वत: पडणार हे नक्की आहे. जवळच बसून पाठीत खंजीर खुपसणार्यांची स्वार्थ वृत्ती, भांडण, तंटे, व्देष आणि इर्षा पाहून गेल्या काही वर्षभरापासून मी तटस्थ होतो. नांदेड न्यूज लाईव्ह वेब पोर्टल सुरु करून पाचवे वर्ष सुरु आहे. सर्वसामान्य जनतेच्या अडी अडचणी, समस्या, धर्म - अध्यात्म सामाजिक घटना घडामोडींना न्याय देण्याचे तळागाळातील पत्रकाराच्या संगे काम करण्याची संधी मिळाली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी