चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा

उपलब्ध करुन द्याव्यात - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई (नृसिंह न्यूज नेटवर्क) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमी येथे येत असतात. या ठिकाणी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात तसेच कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी प्रशासकीय यंत्रणेने आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, अशा सूचना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे दिल्या.

महापरिनिर्वाण दिनी पुरविण्यात येणाऱ्या नागरिकांना सोयी-सुविधांचा आढावा घेण्यासंदर्भात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीची बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी श्री.आठवले बोलत होते. बैठकीस सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सी.एस.थुल, भन्ते राहूल बोधी, महानगरपालिका, रेल्वे प्रशासन, बेस्ट प्रशासनाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री.आठवले पुढे म्हणाले, महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे येणाऱ्या नागरिकांसाठी पुरेशा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, निवासासाठी मंडप उभारावेत, तात्पुरत्या शौचालयाची तसेच स्नानगृहाची व्यवस्था करावी. चैत्यभूमी येथे मोठा जनसमुदाय येत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था चोख राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक तो पोलीस बंदोबस्त तैनात करावा, ठिक ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे लावावेत, चैत्यभूमी परिसरात योग्य प्रकाश व्यवस्था राहील यासाठी मोठ्या क्षमतेचे दिवे लावावेत, ठिक ठिकाणी रुग्णवाहिका, डॉक्टर्स यांची नेमणूक करावी, पुरेसा औषध साठा उपलब्ध करावा, रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त गाड्या सोडण्याची व्यवव्था करावी, तर काही गाड्यांना अतिरिक्त डबे जोडावेत, तसेच महत्वाच्या रेल्वे स्थानकावर चैत्यभूमीकडे जाण्याऱ्या रस्त्यांवर दिशा दर्शक फलक लावावेत, रेल्वेच्या हद्दीच्या बाहेर मुंबई महानगरपालिकेने दिशा दर्शक फलक लावावेत, बेस्ट प्रशासनाने अतिरिक्त बसेस सोडाव्यात. चैत्यभूमी परिसरात स्वच्छता राखली जाईल यासाठी महापालिकेने विशेष दक्षता घ्यावी. चौपाटी परिसरात ठिक ठिकाणी कचरा टाकण्यासाठी कचरा कुंडी ठेवाव्यात. तसेच इतरत्र पडणारा कचरा ताबडतोब उचलला जावा यासाठी विशेष पथकाची नेमणूक करावी, अशा सूचनाही श्री.आठवले यांनी यावेळी दिल्या.

या ठिकाणी जवळपास २५ हजार नागरिकांच्या मोफत जेवणाची व्यवस्था बार्टी या संस्थेमार्फत करण्यात येणार असल्याचे सांगून सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी यावेळी म्हणाले, पुढील वर्षापासून महापरिनिर्वाण दिनाच्या व्यवस्थेसाठी शासनामार्फत निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. बेस्ट प्रशासनाच्यावतीने विविध ठिकाणाहून अतिरिक्त बसेस सोडण्यात येणार आहेत. तसेच दैनंदिन पास रु.७०/- नागरिकांना ओळख पत्रासह देण्यात येतो. परंतु या कालावधीत नागरिकांना ओळख पत्राशिवाय दैनंदिन पास देण्यात येईल. मुंबई दर्शन साठीही काही बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. या कालावधीत वाहतुकीचे नियमन करण्यात येईल. जवळपास १ हजार पोलीस बंदोबस्तासाठी ठेवण्यात येतील, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी