कामठ्याच्या गोपालकृष्ण गौरक्षण संस्थेला समारंभपूर्वक सोहळ्यात गायींचे दान
नांदेड| नांदेडचे कर सल्लागार विवेक साले व त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या जवळील ३६ गायींचे दान केले, हे अमोल धमकार्य आहे, अशा शब्दात प्रा.संजय सारडा यांनी आज विवेक साले यांचे कौतुक केले.
विवेक साले यांच्या डोंगरकडा येथील शेतात गंगूताई साले प्रतिष्ठानच्या वतीने विवेक साले व त्यांच्या कुटुंबियांच्या हस्ते कामठा येथील श्री गोपालकृष्ण गौरक्षण या संस्थेस ३६ गायींचे समारंभपूर्वक दान करण्यात आले. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. डॉ.सुभाष साले हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी विशाल साले, सौ.अश्विनी साले, प्रा.गणेश परखंडे, नंदकुमार देशपांडे, वैजनाथ चौलकार, तिपन्ना वेल्लूरकर हेही उपस्थित होते.
प्रा.सारडा पुढे म्हणाले की, आपल्या मातृरसाने माणसाचं आणि शेणखताने जमिनीचं पोषण करणाNया गोमातेचं जतन व संवर्धन करणं हे आपलं कर्तव्यच नव्हे तर तो आपला परमधर्म आहे, या श्रध्देने विवेक साले यांनी हे गोधन जतन केले आहे आणि त्याच श्रध्देने ते आज हे गोधन कामठा येथील श्री गोपालकृष्ण गौरक्षण संस्थेचे संस्थापक गणपतराव पाथरकर गुरुजी यांच्या स्वाधीन करीत आहेत.
यानंतर विवेक साले, त्यांचे बंधू डॉ.सुभाष साले, पुत्र विशाल साले यांनी गोमातांचे सपत्नीक पूजन केले व हा गोदान सोहळा विधीवत पार पडला. या गोधनाचा स्वीकार करतांना श्री गोपालकृष्ण गौरक्षण संस्थेचे श्यामराव पाथरकर म्हणाले की, विवेक साले यांचे दातृत्व प्रशंसनीय आहे. या गोदान समारंभास विश्व हिंदू परिषदेचे अशोक खोंडे, सोमनाथ कांचनगिरे, सोमनाथ गबार, मकरंद उन्हाळे आदींसह गोप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.