मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई (नृसिंह न्यूज नेटवर्क) सारंगखेडा येथील चेतक महोत्सवाला जागतिक पातळीवर पोहोचवून देश-विदेशातील पर्यटकांना खानदेशात आकर्षित केले जाईल. या महोत्सवाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयोजन करुन खानदेशातील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. सारंगखेडा (जि.नंदुरबार) येथे ३ डिसेंबर २०१७ ते २ जानेवारी २०१८ दरम्यान चेतक महोत्सव होत आहे. यासंदर्भात आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
पर्यटकांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा
यावेळी यंदाच्या चेतक महोत्सवात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. पर्यटकांसाठी निवास, भोजन, पर्यटन अशा सर्वच सुविधा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उभ्या केल्या जाणार आहेत. याशिवाय पर्यटकांसाठी बैलगाडी सफर, सायकल सफर, हॉर्स रायडींग, सांस्कृतिक कार्यक्रम, कॉमेडी शो अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. मुख्यमंत्री म्हणाले, या महोत्सवासाठी राज्य शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. या महोत्सवाच्या माध्यमातून खानदेशासह महाराष्ट्राच्या पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सारंगखेड्यात अश्व संग्रहालय उभारणार - पर्यटन मंत्री जयकुमार रावल
पर्यटन मंत्री जयकुमार रावल यावेळी म्हणाले, सारंगखेड्याचा अश्व महोत्सव हा जगातील सर्वाधिक जुना अश्व महोत्सव आहे. देश-विदेशातील पर्यटकांना खानदेशात आकर्षित करण्याच्या दृष्टीने हा महोत्सव महत्वाचा आहे. गुजरातमधील रण महोत्सव तसेच राजस्थानातील पुष्कर महोत्सवाच्या धर्तीवर या महोत्सवाचे आयोजन तसेच ब्रँडींग करण्यात येईल. आंतरराष्ट्रीय पर्यटक समोर ठेऊनच महोत्सवाचे आयोजन केले जाईल. सारंगखेडा येथे सुमारे ५ कोटी रुपये खर्च करुन अश्व संग्रहालयाचीही उभारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चेतक महोत्सव समितीच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. बैठकीस पर्यटन मंत्री जयकुमार रावल, गृह राज्यमंत्री दिपक केसरकर, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, चेतक महोत्सव समितीचे अध्यक्ष जयपालसिंह राठोड, रण महोत्सवाचे शिवाजी खासनोबिस आदी मान्यवर उपस्थित होते.