विदर्भाच्या वाळूदादांची मराठवाडा हद्दीत घुसखोरी
हिमायतनगर(वार्ताहर)विदर्भातील रेती घाटाचा लिलाव झाल्याचे सांगून काही वाळूदादांची मराठवाडा हद्दीत घुसखोरी करून वाळूचा बेसुमार उपसा सुरु केला जात आहे. या प्रकारास स्थानिक महसुल प्रशासनाच्या अधिकारी कर्मचार्यांची वाळूदादांना मूक संमती मिळत असल्याने शासनाच्या तिजोरीला रक्षणकर्तेच चुना लावत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी नागरीकातून केला जात आहे. या प्रकाराकडे जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची रास्त व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मराठवाडा - विदर्भाच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर अनेक ठिकाणी रेतीचे घाट आहेत. परंतु या वर्षी एकाही रेती घाटाचा महसुल प्रशासनाने अधिकृत लिलाव केला नाही. तरीसुद्धा हिमायतनगर तालुक्यातील घारापुर, पळसपूर, रेणापूर (बेचिराख), मंगरूळ, वारंगटाकळी, कौठा, एकम्बा, बोरी, आदी ठिकाणाहून बेसुमार रेतीचा उपसा अनधिकृत रित्या सुरु असल्याने शासनच रोखीने वसूल होणार महसुल बुडत चालला आहे. परिणामी पर्यावरणाची मोठी हानी होत असून, यामुळे नदीकाठावरील गावकर्यांना पाणी टंचाई सह अन्य संकटाना सामोरे जावे लागत आहे. याचे होणारे परिणाम व पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या तक्रारीवरून यागोदर अनेक वर्तमान पत्रातून वृत्त प्रकाशित झाले. मात्र महसुल प्रशासनाने शुल्लक कार्यवाही करून वाळू तस्करी करणार्यांना अभय देत पुन्हा वाळू उपष्याला मूक संमती दिली आहे.
म्हणूनच कि काय..? तालुक्यातील राजीकीय वरद हस्त असलेल्या वाळूदादांसह विदर्भातील सावळेश्वर, बिटरगाव येथील काहींनी मराठवाड्याच्या हद्दीत घुसखोरी करत कोठा घाटावरून राजरोसपणे पाच ते दहा ट्रेक्टरच्या सहाय्याने दिवस - रात्र वाळूचा उपसा सुरु केला आहे. या भागातील संबंधित पोलिस पाटील, तलाठी, प्रभारी मंडळ अधिकारी यांना हाताशी धरून शासन संपत्तीवर डल्ला मारण्याचा हा प्रकार मागील १५ दिवसापासून जोमात सुरु आहे. या ठिकाणाहून दिवसातून एक वाहन पाच ते सात ट्रीप करून दररोज शेकडो ब्रास रेतीचा उपसा करून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारल्या जात आहे, यासाठी सिरंजनी सज्जाचे तलाठी व प्रभारी मंडळ अधिकारी यांना मोठी रक्कम देवून हा प्रकार चालविला जात असल्याचे एका वाहनचालकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे. एवढा मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असताना महसुलाचे अधिकारी विदर्भातील वाळू घाटाचा लिलाव झाल्याचे सांगून पर्यावर प्रेमी नागरिक व पत्रकारांची दिशाभूल करून स्वार्थ साधण्याच्या प्रयत्न चालवीत आहेत. याबाबत काही पत्रकारांनी पाळत ठेवून दोन दिवसापूर्वी वाळू चोरीचा प्रकार उजेडात आणला, घटना स्थळावरून याची माहिती तलाठी व संबंधिताना दिली. परंतु नेहमीप्रमाणे काल सुद्धा, मी बाहेर गावी आहे असे सांगून कार्यवाही करण्यास टाळाटाळ करून स्वार्थापोटी वाळू दादांना मोकाट सोडले आहे. त्यानंतर पुन्हा वृत्त प्रकाशित करू नका तुम्हाला काय पाहिजे सांगा असे म्हणत काही राजकीय नेत्याकडून प्रकरणावर पडदा टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न चालविला आहे.
वाळूच्या बेसुमार उपश्यामुळे नागरिक व प्रशासनाला रेती चोरीमुळे दुहेरी फटका बसत आहे. पाणी पातळी खालावल्याने नागरिकांना पाण्यासाठी तरसावे लागत आहे. तर प्रशासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडवण्यात वाळूदादा यशस्वी होत आहेत. या दुहेरी संकटातून मार्ग काढण्यासाठी प्रशासन मात्र कोणतीही ठोस उपाययोजना करत नसल्याने महसूल विभागाचे कर्मचारी असलेले पोलिस पाटील, तलाठी आणि मंडळ अधिकारी झोप काढतात काय..? असा संतप्त सवाल पर्यावरण प्रेमी नागरिक करीत आहेत.
महसुलचे वरिष्ठही मुग गिळून गप्प
अनेक वर्तमान पत्रातून रेती तस्करीच्या बातम्या प्रकाशित करून पत्रकारांनी महसूल प्रशासनास कुंभकर्णी झोपेतून जागे करण्याचा प्रयत्न केला. परंतु गेंड्याची कातडी पांघरलेल्या महसूल प्रशासनावर याचा काही एक परिणाम झाला नसल्याचे आजपावेतो दिसून येत नाही. मागील काही दिवसापूर्वी हदगाव चे उपविभागीय अधिकारी दीपक घाडगे यांनी प्रत्यक्ष चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु यास महिना उलटला तरीही ते चौकशी तर सोडाच रेती तस्करीच्या ठिकाणची पाहणी सुद्धा केली नसल्याने रेती तस्कर व महसूल विभगाचे साठेलोटे असल्याची शंका निर्माण होण्यास वाव मिळत आहे.