हेल्मेट धारकांच्या दहशतीने शहरात भीतीचे वातावरण

अवघ्या ७ मिनिटात ९५ लाखाची झाली लुट ; आज नांदेड बंद


नांदेड(रामप्रसाद खंडेलवाल) ८ मे रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास पायल ज्वेलर्स या दुकानात अवघ्या ७ मिनिटात ९४ लाख ४० हजार ३०० रुपयांची लुट खोट्या पिस्तुलाच्या जोरावर चोरट्यांनी केली. आठ दिवसात ही दुसरी घटना आहे. हेल्मेटधारी दोन जणांनी अशीच लुट नवा मोंढा भागात केली होती. हेल्मेटधारकांच्या या प्रकारामुळे शहरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांचा बंदोबस्त करण्यात नांदेड पोलिस यशस्वी होतील का..? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

८ मे रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास वजिराबाद या नेहमीच गजबजलेल्या भागात पायल ज्वेलर्स या दुकानात दोन हेल्मेटधारी आले. एकाने दुकाना बाहेर असलेल्या सुरक्षा रक्षकाला आपल्या कडील पिस्तुलाच्या धाकावर रोखले. एक आत गेला आणि दुकानातील मालक,नोकर आणि ग्राहक यांना खाली बसण्यास भाग पाडले. आणि सोन्याचे दागिने आपल्या कडील पोत्यात भरण्यास सुरवात केली. बाहेर असलेला एक लुटारू आणि त्याच्या हालचाली रस्त्यावरील लोकांनी ओळखल्या आणि आरडा ओरड करण्यास सुरवात केली. आत असलेल्याने ही ओरड लक्षात येताच पोते घेऊन बाहेर आला. लोकां कडे बंदूक रोखून गोळी झाडली पण कोणालाच काही इजा झाली नाही. एवढ्यात लोकांनी त्यांच्यावर दगडफेक करण्यास सुरवात केली. पायल ज्वेलर्स समोर असलेली गल्ली गुजराथी शाळा आणि पी.एन.कॉलेज कडे जाते. त्या रस्त्यावर या चोरट्यांनी आपली मोटार सायकल उभी केली होती. ती दुचाकी काढत असताना जनतेने पुन्हा त्यांचेवर दगडफेक केली पण लुटारूंनी पुन्हा गोळीबार केला आणि आपली दुचाकी काढून मागील रस्त्याने लुटारु निघून गेले. काही लोकांनी सांगितले की ते खडकपुरा रस्त्याने वाघी रस्त्यावर गेले. पोलिसांनी त्वरित सर्वत्र नाकाबंदी लावली पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. 

घटना घडताच पोलिस अधीक्षक,अपर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले, अनेक पोलिस अधिकारी, अनेक पोलिस कर्मचारी पायल ज्वेलर्स कडे आले. पोलिस अधीक्षकांच्या खास पथकातील खास पोलिस सुद्धा आले. पण साप निघून गेल्यावर लाकडे आपटन्या पलीकडे काहीच हाती आले नाही. चोरटे जातांना तिरंगा चौक भागातून गेले असल्याचे अनेकांनी पहिले आहे असे लोक सांगत आहेत. 

पायल ज्वेलर्सचे जगदीश रामेश्वर वर्मा यांनी दिलेल्या तक्रारी नुसार या लुटारूंनी ३.५ किलो सोने आणि एकच चांदीचा लोटा (तांब्या) लुटून नेला आहे. या ऐवजाची एकूण किंमत ९४ लाख ४० हजार ३०० रुपये आहे. वजिराबाद पोलिसांनी अज्ञात लुटारून विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक रघुनाथ कदम करीत आहेत.आठ दिवसां पूर्वी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास नवा मोंढा भागात अशीच लुट लक्ष्मिकांत ट्रेडिंग कंपनी येथे झाली होती. त्यात ९० हजार लुटले गेले होते. आज या लुट आणि पोलिसांच्या नाकर्ते पणासाठी व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आहे. नांदेड शहर आणि त्यातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद असतील असे सांगण्यात आले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी