उपवर-उपवधु परिचय मेळावा : काळाची गरज !
आज आर्य वैश्य समाजाच्या 43 व्या परिचय मेळाव्याच्या आयोजनाबद्दल सर्वप्रथम आयोजकांचे हार्दिक अभिनंदन ! आर्य वैश्य समाजाच्या परिचय मेळावा आयोजनाची बर्याच वर्षांपासूनची परंपरा चालू आहे. विशेष करुन नांदेडचा परिचय मेळावा हा दोन रायांसह संपूर्ण महाराष्ट्रातील समाज बांधवांना जोडणारा आहे. आज घडीला वेळ,श्रम, पैसा वाचविण्याच्या दृष्टीने त्यासोबतच समाजाच्या प्रगतीसाठी परिचय मेळाव्याप्रमाणेच सामुहिक विवाह मेळावे होणे देखील गरजेचे आहेत. आजही आपल्या समाजात शिक्षणाचे प्रमाण म्हणावे त्या प्रमाणात नसल्यामुळे तसेच बहुतांश व्यक्तींचा उदरनिर्वाहाचे साधन हे व्यापार आहे. आता मात्र बदलत्या परिस्थितीनुसार शिक्षण शिकून आपल्या समाजातील व्यक्ती व्यापार सोडून इतरही क्षेत्रात आगेकूच करत आहेत. समाजात जुन्या प्रथा, चाली रुढी , परंपरांना विशेष महत्व आहे. समाजाची आर्थिक परिस्थिती समाधानकारक नसल्यामुळे तसेच समाजाची संख्या अत्यल्प असल्यामुळे आपल्या आर्य वैश्य समाजाला सुध्दा आरक्षण मिळण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे आणि ती योग्य आहे आणि यासाठी समाजातील सर्वच स्तरातून ही मागणी पूर्णत्वास नेण्यासाठी योगदान देणे गरजेचे आहे.
विकासाच्या प्रक्रियेत भाग घेत असतांना कोणत्याही एका व्यक्तीने विकास होत नसतो जेंव्हा एक व्यक्ती, एक कुटूंब, एक समाज, संपूर्ण समाज तसेच संपूर्ण गाव, संपूर्ण शहर, संपूर्ण राष्ट्र त्याप्रक्रियेत सहभागी होईल तेंव्हाच विकास होत असतो. आधुनिकीकरणाच्या सोशल मिडीयाच्या युगामध्ये आज आपण आजू- बाजूला असून सुध्दा खूप लांब गेलोत त्याचप्रमाणे पैसा कमविण्यासाठी तसेच भौतिक सोई-सुविधा मिळविण्याच्या नादात आपण स्वत:पासून खूप दूर चाललेलो आहोत हे आता जाणवू लागले आहे. आज घडीला पैसा आहे मात्र वेळ नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्याच्या आधुनिक युगात मुला-मुलीचे लग्न जुळविणे हा मोठा आव्हानात्मक प्रश्न समाजासमोर उभा राहिला आहे. एकमेकाला अनुरुप जोडपे शोधने हे अवघड काम असून त्यात वधु आणि वर पित्याचा खूप वेळ वाया जात आहे सद्यस्थितीत समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. शिक्षक, प्राध्यापक, वकील, डॉक्टर, इंजिनइर, अभियंता,लेखक, उद्योगपती आदी क्षेत्रात समाजातील मुलं-मुली स्वत:चे प्रतिनिधीत्व स्वत:च करतांना दिसत आहेत ही बाब समाजातील प्रत्येकासाठी अभिमानास्पद आहे.
विवाहाच्या बाबतीत अनेक प्रचलित परंपरा आज समाजात आहेत. वधु - वर परिचय मेळाव्यात येवून मुला-मुलीने परिचय देणे, सामुहिक विवाह मेळाव्यात लग्न करणे यासाठी संकुचित पणा काही प्रमाणात जाणवत आहे. परिचय मेळाव्यात येवून स्वत:चा परिचय देणे आजही काही जणांना संकोच वाटत आहे. खरे तर अनेक वधु आणि वरपिता आपल्या मुला-मुलींना अनुरुप जोडीदार निवडण्यासाठी बेजार आहेत. निवड करतांना कधी- कधी वर्ष - दोनवर्षही जातात त्यामुळे वेळ, श्रम, पैसा यांचा फार मोठा अपव्यय होतो. आपल्या आसपासच उचित आणि अनुरुप जोडीदार असतो पण केवळ आपणांस माहिती नसल्यामुळे तसेच संकुचित पणामुळे संबंध जुळले जात नाहीत म्हणून तर समाजाचा वेळ, पैसा, श्रम वाचविण्यासाठी वधु-वर परिचय मेळाव्याची नितांत गरज आहे.
आजही आपल्या समाजातील बहुतांश समाजबांधव हे आपले दैनंदिन जीवनात पारंपारिक रुढी - परंपरा, जुन्या प्रथा, चाली-रिती पाळतात. विवाह संस्कार ही कुटूंबसंस्थेतील अत्यंत संवेदनशिल बाब समजली जाते. आपल्या समाजात उपवर- उपवधूंना लग्नाच्या बेडीत अडकवण्यापूर्वी नाते संबंध, पंचांगातील गुण आदी पाहून या की पारंपारिक रुढी परंपरेनुसार चालत आलेल्या पध्दतीनुसार विवाह जुळविले जातात या गोष्टी आजच्या सोशल मिडीयाच्या युगात कालबाह्य वाटत असल्यातरी याची नोंद घेणे गरजेचे आहे. सुशिक्षित ज्ञानसंपन्न पिढीने आता जुन्या कालबाह्य परंपरा सोडून नव्या विचारांची कास धरणे गरजेचे आहे यात उपवर-उपवधूंचे व्यक्तीमत्व , शिक्षण, वर्तूणूक, परिस्थितीशी जुळवूण घेणारे तसेच एकमेकांविषयी सामंजस्य , आदरपणासोबतच वरीष्ठांना मान सन्मान देणारे असावेत मात्र सद्यपरिस्थितीत दिखावूपणा व भौतिक सुख-सोई सुविधांपुढे वरील बाबींकडे साफ दुर्लक्ष होत आहे असे दिसते.
उपवर - उपवधु परिचय मेळाव्यामुळे वर-वधूंसोबतच इतर नातेवाईकांचाही अल्पसा का होईना एकमेकांना परिचय होतो. वधु-वर परिचय मेळाव्यात अगदी मन-मोकळे पणाने एकमेकांना पाहता येते. सर्वांच्या समोर येऊन परिचय दिला, शिवाय आपल्या जोडीदाराविषयी अपेक्षा व्यक्त केल्याने परस्परांच्या आवडी-निवडी कळु शकतात. स्वत: परिचय दिल्याने त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज येतो. भविष्यातील अनेक कल्पना स्पष्ट होतात. परस्परांची शैक्षणिक पात्रता जुळल्याने पुढील संबंधासाठी मोकळ्याापणाने बोलता येत म्हणून तर वधु-वर परिचय मेळावा ही काळाची गरज बनली आहे. उपवर - उपवधू परिचय मेळाव्याच्या आयोजना मागचा चांगला उद्देश सफल करण्यासाठी समाजातील प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.
- विनोद विलासराव महाजन