आदर्शग्राम

हिमायतनगर(अनिल मादसवार)पंतप्रधान यांच्या उपक्रमाने विकासापासून दूर असलेल्या गाव आदर्श बनविले जाणार आहे. त्यासाठी तुमच्या वाळकेवाडी गावची निवड केली असून, गाव दत्तक घेतले म्हणून आपण शांत बसता कामा नये. कारण तुमचे गाव हे कोणी अधिकारी येवून आदर्श बनविणार नाहीत यासाठी आपला लोकसहभाग आवश्यक आहे. असे मत खा.राजीव सातव यांनी व्यक्त केले. ते वाळकेवाडी या दत्तक गावाच्या सांसद आदर्श ग्राम योजनेच्या प्रथम ग्रामसभेच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी मंचावर माजी आ.माधवराव पाटील, विजय खडसे, गंगाधर चाभारेकर, जिल्हा नियोजन अधिकारी गिरगावकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यु.ए.कोमवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राठोड, पाणी पुरवठा व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रामोड, नरेगाचे टोम्पे, पाणी पुरवठ्याचे डावखरे, तहसीलदार शरद झाडके आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रथम संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर येथील एका शिक्षकाने बनविलेले रिमोट वरील मशाल खा.सातव यांच्या हस्ते पेटविल्या गेली. मान्यवरांच्या सत्कार समारंभानंतर पुढे बोलताना ते म्हणाले कि, आपले गाव स्वच्छ - सुंदर व निरोगी ठेवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आपल्या घरासह गावची स्वच्छता करण्याकडे सर्वांनी एकजुटीने लक्ष द्यायला हवे. तसेच व;एके वाडी हे गाव दत्तक घेतले म्हणजे सर्व काही याच ठिकाणी होईल असे नाही. या गावाबरोबर आजू- बाजूच्या परिसरातील गावाला याचा फायदा झाला पाहिजे. तेंव्हा आगामी काळात आपले व आपल्या गावातील नागरिकांचे आरोग्य अबाधित व निरोगी ठेवण्यासाठी सर्वांनी लोकसहभाग नोंदवावा असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी कार्यक्रमच्या अध्यक्षीय भाषणात माजी आ.माधवराव जवळगावकर म्हणाले कि, गावातील सर्व नागरिकांनी मिळून सामुहिक रित्या आदर्श गाव करण्यासाठी प्रयत्न करावेत. सन २०१६ नंतर नव्याने निवडण्यात येणाऱ्या संसद आदर्श ग्राम योजनेच्या गावाच्या विकासाच्या पाहणीसाठी आदर्श गाव म्हणून सर्व गावकरी वाळकेवाडी या गावाकडे पाहतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

या गावाची लोकसंख्या सन २०११ च्या जनगणनेनुसार ३३८६ असून, १६५८ महिला, १७२८ पुरुष असून, येथे एकूण ६३४ कुटुंब वास्तव्य करतात. स्वच्छ मिशन भारत योजनेनुसार हे गाव हगणदारी मुक्तीकडे वाटचाल करीत आहे. आदर्श गाव संकल्पनेनुसार या गावात पाणी पुरवठा नळ योजना, पाणलोट क्षेत्रांतर्गत कामे, त्याचबरोबर पाझर तलाव, शेततळे, बंधारे, रोजगार हमी योजनेनुसार पाणदन व शेत रस्त्यांचे मजबुतीकरण, गावातील अंतर्गत रस्ते, सिमेंट रस्त्याने जोडणे, गावाचे सुशोभिकरण व पर्यावरणासाठी रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षलागवड करणे, दर्जेदार शिक्षणासाठी विविध शालेय योजना राबविणे, दर आठवड्याला गावात आरोग्य शिबीर घेणे, गावात पक्के घर बांधणेसाठी बँकेकडून गृहकर्ज योजना आणि गावातील संपूर्ण कुटूंबाचा विमा उतरविणे बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करणे, शेतक-यांना विविध शेती विषयक प्रशिक्षण राबविणे. गावात शुध्द पाणी पुरवठा योजना आदि विकास कामे या योजनेतून करण्यात येणार आहे. यासाठी गावातील नागरिकांचा यात आर्थिक व स्रामादानातून लोकसहभाग मिळणे गरजेचे आहे. त्यातून प्रथम व्यसनमुक्त, पिण्याचे स्वच्छ पाणी, सर्वांनी शौच्चालय बांधावे, तरच गाव स्वच्छ होईल असे पाणी पुरवठा व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रामोड यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रस्ताविक भाषणात श्री गोरेगावकर म्हणाले कि, गावातील पालकांनी मुलांच्या शिक्षणाबरोबर मुलभुत सुविधेकडे लक्ष द्यावे. गावात नुसती शाळा चांगली राहून फायदा नाही, तर गुणवत्तेचा विकास झाला पाहिजे, हेच आदर्श ग्रामयोजनेचे ध्येय आहे. गाव विकासाचा आराखडा मार्च अखेर पर्यंत पूर्ण होईल, तत्पूर्वी गावकर्यांनी स्वच्छतेला महत्व देवून स्राम्दानातून गाव संपूर्ण स्वच्छ करून घाण पाणी, नळाच्या तोट्या नीटनेटक्या कराव्यात असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी कार्यकारी अभियंता ल.पा. श्री पैलवाड, उपजिल्हाधिकारी कैलास शेळके, जी.प.सदस्य सुभाष राठोड, दिलीप बास्टेवाड, पंचायत समिती सभापती आडेलाबाई हातमोडे, उपसभापती लक्ष्मीबाई भवरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती परसराम पवार, विकास पाटील, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडूरंग गाडगे, सचिव अनिल मादसवार, माजी अध्यक्ष कानबा पोपलवार, गंगाधर वाघमारे, असद मौलाना, धम्मपाल मुनेश्वर, आदीसह अनेक मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी