रुग्णांची हेळसांड



हिमायतनगर(अनिल मादसवार)शहरात नव्यानेच सुरु झालेल्या ग्रामीण रुग्णालयात अनेक सोई -सुविधांचा अभाव दिसून येत आहे. जबाबदार वैद्यकीय अधीक्षक व डॉक्टर रजेवर गेल्याने व औषध निर्मात्याच्या मनमानी कारभारामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. सध्या तरी केवळ एका वैद्यकीय अधिकारी श्री गायकवाड यांच्यावर ग्रामीण रुग्णालयाचा कारभार चालत आहे. 

रुगणालय सुरु झाल्याने शहरासह ग्रामीण भागातील रुग्णाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु सध्या तरी या ठिकाणी रुग्णांना शुद्ध पिण्याच्या पाणी, विद्दुत गुल झाल्यास जनरेटरची सुविधा नसल्याने रात्रीला अंधाराचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी रुग्णांसाठी असलेले महिला - पुरुषाचे शौच्चालय नेहमीच कुलुपबंद राहत आहे. तसेच उपचारार्थी रुग्णासाठी असलेल्या कॉटवरील सर्व सुविधा रुग्णांना मिळत नाहीत. 

गोर - गरीब रुग्णांना मोफत उपचार व औषधीची सोय शासनाने केलेली असताना बहुतांश औषधी सुद्धा बाहेरून आणावी लागत असल्याने ग्रामीण रुग्णालय असून, अडचण नसून खोळंबा असा प्रत्यय उपचारासाठी आलेल्या नागरिकांना येत आहे. एवढेच नव्हे तर वैद्यकीय अधीक्षक महाशय गरजुंकडून ५० ते १०० रुपये घेतल्याशिवाय वयाचे प्रमाणपत्र देत नसल्याचे अनेकांनी पत्रकारासमक्ष बोलून दाखविले आहे. या प्रकारात सुधारणा होऊन रुग्णांना योग्य त्या सुविधा न मिळाल्यास शहर व ग्रामीण भागातील नागरिक प्रशासनाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. 

परिणामी कोट्यावधी रुपये खर्च करून नव्याने बांधण्यात आलेली ग्रामीण रुग्नालायची टोलेजंग इमारत राजकीय नेते, अभियंते व गुत्तेदाराच्या फायद्यासाठी बांधण्यात आली कि काय..? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या रुग्णालयात एकूण २६ मान्य पदे असून, त्यापैकी वैद्यकीय अधीक्षक -०१, वैद्यकीय अधिकारी - ३, अधिपरिचारिका - ७ पैकी १ रिक्त, परिचारिका - १ रिक्त, औषध निर्माता - १, प्रयोग शाळा तंत्रज्ञ -१, एक्सरे टेक्निशियन -१ रिक्त, वाहन चालक -१, सहाय्यक अधीक्षक -१, कनिष्ठ लिपिक -२, आदींसह शिपाई, चालक, सेवक व सफाई कामगार आदी पदांची या रुग्णालयात मान्यता आहे. काही पदे सोडली तर जवळपास सर्वच पदे भरलेली असून, परंतु जबाबदार अधिकारी म्हणून वैद्यकीय अधीक्षक गाडेकर यांची नियुक्ती केलेली आहे. परंतु ते महाशय सुद्धा अधावाद्यातून अनेक दिवस गैरहजर राहत असल्याने रुग्णांना आर्थिक झळ आणि अनंत अडचणीचा सामना करावा लागतो आहे. 

येथील तीन वैद्यकीय अधिकार्यापैकी दोन डॉक्टरांनी आपला कारभार जुन्या रुग्णालया प्रमाणेच सुरु ठेवला असून, वेळेवर उपस्थित राहत नसल्यामुळे गरजू रुग्णांना सेवा देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप या ठिकाणी उपस्थित रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. एवढेच नव्हे या दोन डॉक्टरांनी गत आठ ते दहा दिवसापासून अनधिकृत रित्या सुट्टी घेतली असल्याचे विश्वसनीय वृत्त असून, त्यामुळे डॉ. डी.डी.गायकवाड यांच्यावर रुग्णालयाचा सर्व भार पडला आहे. 

वैद्यकीय अधीक्षकांचा खोटारडेपणा 

रुग्णांच्या तक्रारीवरून आज सकाळी ११.१० वाजता पत्रकारांनी हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयास भेट दिली असता वैद्यकीय अधीक्षक श्री गाडेकर हे अनुपस्थित असल्याचे त्यांच्या कुलुपबंद काक्षावरून दिसून आले. याबाबत त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता मी दवाखान्यातच आहे, रुग्ण काहीही सांगतात. माझ्यावरील कामाचा ताण तुम्हाला काय..? माहित अशी उर्मट पणाची उत्तरे देवून फोन बंद केला. यावरून अधीक्षक गाडेकर हे किती कर्तव्य दक्ष आहेत याचा प्रत्यय आला आहे. 

औषध निर्मात्याच्या मनमानी कारभारामुळे रुग्णांची हेळसांड 

येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत औषध निर्माता डी.एस.सुकारे यांनी मनमानी कारभार सुरूच ठेवला असून, औषधी उपलब्ध असताना देखील रुग्णांना न देणे, दिले तर माहिती न सांगणे असा प्रकार सुरु केला आहे. एवढेच नव्हे तर रुग्णासाठी आलेल्या सतरंजी, चादर हे पैकिंग अवस्थेत त्यांच्या दालनात कुलूप बंद ठेवले आहे. परिणामी रुग्णांना घरच्या चादरांचाच आसरा घ्यावा लागत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी