टक्केवारीसाठी रस्त्यांची कामे

हिमायतनगर(अनिल मादसवार)हदगाव - हिमायतनगर मतदार संघातील विद्यमान आमदाराने विकासाच निर्माण केलेला भास हा पोकळ असून, टक्केवारी मिळविण्यासाठी सिमेंट रस्त्याच्या कामावर जोर देऊन विकास झाला म्हणणे हे सारासार चुकीचे आहे. असा घणाघात काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष व विधानसभा मतदार संघाचे संभाव्य उमेदवार जाकेर चाऊस यांनी केला.

ते हिमायतनगर येथे माजी जी.प.सदस्य समद खान हाजी जलाल खान यांच्या निवास स्थानी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेसने माझ्या सारख्या तळागाळातील कार्यकर्त्यावर अन्याय केला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलेला शब्द पाळला नाही. ज्या पक्षनेतृत्वावर विश्वास ठेवून मी २००४ साली काँग्रेस मध्ये प्रवेश केला. त्यांनी मात्र वेळोवेळी अल्पसंख्यांक समाजातील कार्यकर्त्यामध्ये भांडण लावून मला विधान परिषदेवर किंवा महामंडळावर घेण्याचा शब्द पाळला नाही. वेळोवेळी परंपरागत उमेदवारांना संधी देवून दलित, आदिवासी, मुस्लिम आणि ओबीसीच्या मतांचा सत्तेसाठी वापर करून घेतला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत हदगाव - हिमायतनगरच्या आमदाराने सेनेच्या उमेदवारा सोबत अंडर-ग्राउंड सेटलमेंट करून ओबीसी माळी समाजातील काँग्रेसचेच उमेदवार राजीव सातवांचा पराभव व्हावा या उद्देशाने हिमायतनगर तालुक्यात एकही सभा लावली नाही. कि प्रचार यंत्रणा सक्षमपने राबविली नसल्यानेच सेनेच्या उमेदवाराला या विधानसभा मतदार संघात मताधिक्य मिळाले आहे. केवळ ओबीसी असल्यामुळेच सत्तेची मक्तेदारी समजनार्यांनी सातव यांचा पराभव करण्याचे ठरविले होते, असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला.

मराठा समाजाने लोकसभा निवडणुकीत चालविलेले जातीचे कार्ड पाहता आदिवासी मुल्सिम, बौद्ध व इतर मागास प्रवर्गात त्याचा संदेश पोहोचला असल्याने द्या टाळी.. हटाव माळी.. या जातीय वक्तव्याचा मला या निवडणुकीत नक्कीच फायदा होईल असेही ते म्हणाले.

आ.जवळगावकर यांच्या विकासाच्या डोंगरावर प्रहार करताना तो मतदार संघाचा विकास नसून सोबत राहणाऱ्या चमच्यांचा विकास असल्याचेही ते म्हणाले. मतदार संघात रोजगार निर्मित्तीचे प्रकल्प, बेकारांना कर्जपुरवठा, शिक्षणाचा खालावलेला दर्जा, निराधारांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या अनेक समस्या, अजूनही जिवंत असल्याने केवळ सिमेंट रोड करणे म्हणजे विकास नाही. तर गेली पाच वर्ष स्वतःचा विकास करून घेण्यातच आ.महोदयांनी वेळ घालविला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

हात्तीवर स्वार होऊ इच्छिणाऱ्या चाऊस यांना समदखानचे बळ

आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टीच्या हत्तीवर स्वार होऊन निवडणूक लढऊ इच्छिणाऱ्या जाकेर चाऊस यांच्या पाठीशी हिमायतनगर तालुक्याचे मोठ्या प्रमाणात मुस्लिम, ओ.बी.सी, एस.सी., एस.टी.,प्रवर्गातील मतदार असल्याने या निवडणुकीत मी सर्व ताकदीनिशी जाकेर चाऊस यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे माजी जी.प.सदस्य समद खान हाजी जलाल खान यांनी सांगितले. त्यांनी आमदार व त्यांच्या सोबत असलेल्या चार - पाच कार्यकर्त्यांना चांडाळ चौकडी संबोधत हा केवळ त्या चांडाळ चौकडीचा विकास आहे. इतराचा मात्र फक्त मतापुरता वापर होत असल्याची सडकून टीकाही त्यांनी केली. पत्रकार परिषदेपूर्वी मुस्लिम शादीखाना येथे पार पडलेल्या सभेत खच्चाखच भरलेला सभाग्रह पाहता कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोंचला होता. बहुजन समाज पार्टीच्या सुरेश गायकवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना चाऊस यांचा उमेदवार म्हणून स्वीकार करणार का..? असा सवाल विचारला असता सभग्रहातुन जल्लॊश पूर्ण जिंदाबादच्या घोषणांनी शादीखाना दुमदुमून गेला. त्यामुळे जाकेर चाऊस हे बहुजन समाज पार्टीचे उमेदवार म्हणून जवळपास निश्चित मानले जात आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी