रिमझिम पावसाने कोवळ्या पिकांना जीवदान..
हिमायतनगर (अनिल मादसवार)पावसाने डोळे वटारल्यामुळे मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट पसरले असून, दुबार तिबार पेरणी करून हताश झालेल्या शेतकर्यास आज झालेली रिमझिम पावसाने दिलासा मिळला आहे. नुकत्याच बीजातून अंकुरलेल्या पिकास आजच्या पावसाने जीवदान मिळाले असले तरी बळीराजाच्या एका डोळ्यात आसू..तर एका डोळ्यात हसू.. असे चित्र आहे.
अर्धा पावसाळा संपत आला तरीहि हिमायतनगर तालुक्यातील नदी - ओढे अजूनही खळवळून वाहिला नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर स्वरूप धारण करीत असतानाच जनावरांच्या चार्याचा प्रश्नही उग्ररूप धारण करून समोर उभा आहे. जून - जुलै महिन्यात पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकर्यांना दुबार तिबार पेरणी करावी लागली, तरी पाऊस झाला नसल्याने बळीराजा हैराण झाला आहे. निसर्गाच्या अवकुपेने मराठवाड्यातील शेतकऱ्यावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. दुकानदार उधार देईना.. आन काळ्या आईला पाडीत पडू देऊ वाटेना.. अशी अवस्था बळीराजाची झाली आहे. अश्यावेळी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहाण्याची आपेक्षा शेतकरी वर्गातून केली जात असून, आर्थिक मदतीसह जनावरासाठी चारा छावण्या, वीज बिल माफी, मजुरांच्या हाताला काम, कृषीकर्ज माफी देऊन शेतकर्यांना दुष्काळाच्या संकटातून वाचवावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने केली आहे.
कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करण्याची सवय जडलेल्या बळीराजास मात्र बुडत्याला काडीचा आधार म्हटल्या प्रमाणे, सर्वन महिन्यात सुरु झालेल्या रिमझिम पावसाने अंकुरलेल्या पिकांना जीवदान मिळाले खरे, मात्र पिकांची वाढ खुंटून आगामी काळातील शेती उत्पन्नात ७० टक्क्याहून अधिक उत्पादन घटणार असल्याचे चित्र परिसरातील पिकांच्या पाहणीवरून स्पष्टपणे जाणवत आहे.