प्रशासनाची डोळेझाक

पाऊस पडला नसल्याने माफियांचा वाळू उपश्यावर जोर...प्रशासनाची डोळेझाक  


हिमायतनगर(अनिल मादसवार)जून महिना संपत आला असला तरी पाऊस पडला नसल्याने विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारी नदी व तालुका परिसरातील नाल्याचे पात्रे अद्याप कोरडी आहेत. त्याचा फायदा वाळू माफिया घेत असून, लिलाव झालेल्या एका व लिलाव न झालेल्या पाच ते सहा वाळू घाटावरून बेकायदा वाळूचा उपसा सुरू आहे. हि बाब स्थानिकच्या तलाठी व मंडळ अधिकायांना माहित असताना देखील स्वार्थापोटी डोळेझाक करीत असल्याने वाळू माफियांचे मनसुबे वाढले आहेत. थेट नदीतील वाळू बाहेर काढून मोठ्या प्रमाणात साठेबाजीवर भर दिल्याचे पळसपूर, कोठा, एकंबा, सिरपल्ली, रेणापूर, दिघी, घारापुर, वारंगटाकळी, कामारी परिसरातील वाळूंच्या ढिगारावरून दिसून येत आहे.    

यावर्षी जिल्ह्यातील वाळू साठ्यांच्या लिलावाला कमी प्रतिसाद मिळाला. प्रशासनाने वाळू उपश्यासाठी केलेल्या कडक नियमावलीमुळे अनेक ठेकेदार लिलाव घेण्यासाठी आले नाहीत. दिवाळीनंतर वाळू उपसा जोमात सुरु झाला तरी प्रशासनाने लक्ष दिले नाही. त्यानंतरच्या काळात लोकसभा निवडणुकीच्या कामात प्रशासन व्यग्र होते. त्यामुळे वाळू माफियांना मोकळे रान मिळाले. त्यामुळे लिलाव झालेले घारापुर सह न झालेल्या पळसपूर, कोठा, एकंबा, सिरपल्ली, रेणापूर, दिघी, वारंगटाकळी, कामारी, कोठावाडी वाळू साठे राजरोसपणे उपसण्यात येत आहेत. पावसाळ्यात तरी हा प्रकार थांबेल असे पर्यावरण प्रेमीना वाटत असताना पाऊस लांबल्याने नाले - नदीचे पात्र कोरडे पडल्याने वाळू साठे उघडे पडले आहेत. काही वाळू माफियांनी राजरोसपणे उपसा करून वाळू व्यावसायिकांना विकण्याचा धंदा चालविला आहे. रात्रंदिवस चार ते पाच वाळूचे ट्रेक्टर द्वारे वाळूचा उपसा करून अधिकारी - कर्मचार्यांच्या साक्षीने प्रशासनाला गंडविले जात आहे.

नांदेड जिल्ह्याच्या दृष्टीने वाळू हा संवेदनशील विषय आहे, जिल्ह्यातील बिलोली, नायगाव, लोहा, धर्माबाद, हदगाव, किनवट, माहूरसह हिमायतनगर तालुक्यात प्रशासनालाही न जुमानता व्यवसाय करणारे वाळू माफिया तथा ठेकेदार राजकीय वरद हस्ताने आपला हा गोरखधंदा चालवीत आहेत.  वाळू उपशावर लक्ष ठेवण्यासाठी संबंधित तहसीलदार , मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यावार्जाबाब्दारी सोपविण्यात आली आहे. तसेच नव्या नियमाप्रमाणे वाळू उपशावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतींवर टाकण्यात आली आहे. मात्र, स्थानिक पदाधिकारी, वाळू माफिया, महसूल   अधिकाऱ्यांना धरून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारला जात असल्याने कधी शुल्लक कार्यवाही दाखून मालामाल होत आहेत. या प्रकारामुळे वाळू व्यावसायिकांवर कोणतीच कारवाई होत नसल्याचे पाहून काही ठिकाणी शेतकरीही आता या व्यवसायात उतरले आहेत. अलीकडेच केलेल्या एका पाहणीत पैनगंगा नदीकाठी असलेल्या पळसपूर, घारापुर, रेणापूर, कोठा वाडी, एकंबा, सिरपल्ली, कामारी, हिमायतनगर, दिघी, यासह अन्य ठिकाणच्या परिसरात शेकडो ठिकाणी नदीतून वाळू बाहेर आणून साठविल्याचे दिसून आले आहे. यामुळे हिमायतनगर तालुका परिसरातील भूजल पातळी खालावली असून, नदी काठावरील गावांना पाणी टंचाई जाणवत आहेत, तर हिमायतनगर शहरात दोन टँकरद्वारे पाणी पुरवठा करून टंचाई दूर करण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे. या टंचाईस बेसुमार वाळू उपसाही कारणीभूत असल्याचे जुन्या जाणकारांचे म्हणणे आहे. 

होत असलेल्या बेकायदा वाळू उपष्याची माहिती काही जागरूक पर्यावरण प्रेमी नागरिकांनी तीन दिवसापूर्वी येथील प्रभारी तहसीलदार श्री गायकवाड यांना दिली होती. मात्र अद्याप कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने लाचखोर तलाठ्यांच्या माध्यमातून वाळू माफियांचे फावले जात आहे. या प्रकाराकडे कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी हिमायतनगर तालुक्याकडे लक्ष देऊन शासनाला गंडऊन तिजोरीवर डल्ला मारू पाहणाऱ्या अधिकारी कर्मचारी तथा वाळू माफियांच्या मुसक्या आवळाव्यात अशी रास्त मागणी पर्यावरण प्रेमी नागरीकातून केली जात आहे.  

मागील काळात पळसपूर सज्जाचे तलाठी श्री सुगावे व सिरंजनी सज्जाचे तलाठी श्री शे.मोइन यांनी वाळू माफियांना पकडून कोणतीही कार्यवाही न करता सोडून दिल्याची चर्चा सुरु आहे. यावरून बहुतांश वर्तमान पत्रातून वृत्त प्रकाशित झाले होते. त्यानंतर संबंधित तलाठ्यांनी काही दिवसाच्या सुट्ट्या उपभोगुन या कारनाम्यावर मंडळ अधिकार्याच्या माध्यमातून पडदा टाकण्याचा प्रयत्न चालविला असल्याची विश्वसनीय माहित आहे. त्यामुळेच कि काय..? पाऊस लांबणीवर गेल्याची संधी साधून पुन्हा या परिसरात माफियांनी राजरोसपणे वाळूचा उपसा सुरु करून साठेबाजीवर भर दिल्याचे नदीकाठावरील नागरिकांचे म्हणणे आहे.  
याबाबत प्रभारी तहसीलदार श्री गायकवाड यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही. 
याबाबत मंडळ अधिकारी श्री सय्यद इस्माईल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, काल दि.२८ रोजी पळसपूर येथे निनावी १०० ब्रास्साचा एक रेती साठा व सरसम येथील मुस्लिम कब्रस्तान  येथे २८ ब्रास निनावी साठा जप्त केला आहे. मात्र या ठिकाणी पोलिस पाटील नसल्यामुळे वाळू साठा अजूनही कोणाच्या ताब्यात दिला नसल्याचे त्यांनी सांगितले. 
  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी