आयुक्तांच्या दौ-यात

आयुक्तांच्या समाधान दौ-यात मालमत्ताधारकांच्या शंकांचे निरसन



नांदेड(अनिल मादसवार)मालमत्ता कर आकारणी किंवा मागणी बिलासंबधी शंका असलेल्या शिवाजीनगर क्षेत्रिय कार्यालय (क्र. 1) अंतर्गतच्या सुमारे तीनशे मालमत्ताधारकांनी सोमवारी (दि.20) मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्याशी व्यक्तीश: चर्चा करुन आपले शंका समाधान करुन घेतले. अनाधिकृत बांधकामाची अतिरिक्त शास्ती माफ़ी टाळण्यासाठी आणि चालू करातील 2 टक्के सूट योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुक्तांच्या आवाहनानंतर काहींनी लगेच पूर्ण कर जमा केले आणि त्यांचे समाधानही झाले.

उद्या मंगळवारी (दि.21) अशोकनगर क्षेत्रिय कार्यालयात (स्टेडियम परिसर) सकाळी 11 ते 2 या वेळेत आयुक्त मालमत्ताधारकांच्या भेटीसाठी थांबणार आहेत. मालमत्ताधारकांनी येताना जुनी कर भरल्याची पावती आणि चालू मागणी बील सोबत आणावे, जेणेकरुन शंकानिरसन करता येईल, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

मालमत्ताधारकांना भाडेपध्दतीऐवजी मूल्याधारित करप्रणालीप्रमाणे कराची आकारणी झाल्यानंतर मागणी बिलात झालेल्या वाढीबाबत तक्रारी होत्या. त्यात सर्वसाधारण सभा आणि अलीकडेच महापौरांच्या अध्यक्षतेखालील सर्वपक्षीय समितीने 31 जानेवारीपर्यंत मालमत्ताधारकांनी त्यांच्याकडील संपूर्ण कर भरला तर अनाधिकृत बांधकाम शास्तीतून अधिकृत बांधकामाचे क्षेत्र वगळून तसेच चालू करात 2 टक्के सूट देण्याचे निश्चित केले आहे. याउपर मालमत्ताधारकांच्या प्रकरणनिहाय वेगळ्या समस्या असतील किंवा कर निर्धारण चुकीचे झाल्याच्या तक्रारी असतील तर त्या जाणून घेण्यासाठी मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी आज सोमवार पासून (दि.20) क्षेत्रिय कार्यालयनिहाय सकाळी 11 ते 2 यावेळेत समाधान दौरा सुरु केला आहे.

सोमवारी शिवाजीनगर क्षेत्रिय कार्यालयात आयुक्तांना काही नागरिकांची शिष्टमंडळे एकत्रपणे भेटली, त्यांच्याशी एकत्रित आणि भेटण्यासाठी आलेल्या प्रत्येक मालमत्ताधारकांशीही व्यक्तीश: चर्चा करुन आयुक्तांनी त्यांचे समाधान केले. यावेळी उपायुक्त राजेद्र खंदारे, सहाय्यक आयुक्त शिवाजी डहाळे, गुलाम सादेक, कर विभागाचे दत्तात्रय पाटील तसेच शिवाजीनगर क्षेत्रिय कार्यालयाचे सर्व वसुली लिपीक उपस्थित होते.

 गेल्या सात वर्षात मालमत्ता करात कोणतीही वाढ झालेली नाही. तसेच ज्यांनी जानेवारी 2008 पूर्वी अनाधिकृत बांधकाम केले परंतु वेळेअभावी किंबा गैरसमजुतीमुळे त्याची नोंद त्यांनी कर विभागाकडे केली नाही, अशा मालमत्ताधारकांना अनाधिकृत बांधकामाची शास्ती लागणे अपरिहार्य आहे. परंतु संबधितांनी मागणी बिलातून तितक्या बांधकामाची शास्तीची रक्कम वगळून उर्वरीत कराचा भरणा करुन दि. 31 जानेवारी 2014 पर्यंत अपील दाखल केले तर त्याचा निर्णय घेता येईल, असे आयुक्तांनी यावेळी संगितले.

 काही मालमत्ताधारकांनी मुलभूत सुविधेबद्दल तक्रारी केल्या. त्याची नोंद आयुक्तांनी घेऊन मलनि:सारण, घनकचरा साफ़सफ़ाई करण्यासारख्या तक्रारी तात्काळ मार्गी लावण्याची सूचना यावेळी अधिका-यांना दिल्या. तसेच ज्या कामात तांत्रिक अडचणी आहेत, त्या दूर करण्यासाठी संबधित अधिका-याशी चर्चा करण्याचीदेखील ग्वाही यावेळी दिली.

ज्येष्ठ नागरिक आणि सेवानिवृत्त कर्मचा-यांनी त्यांच्यासाठी मालमत्ता करात सवलतीची तसेच इतर मालमत्ताधारकांनी पुढील वर्षी आधी कर भरणा-या करदात्याला अधिक सूट देण्यात यावी, अशी मागणी केली. हे दोन्ही विषय सर्वसाधारण सभेसमोर ठेवून आवश्यकतेनुसार शासनाकडे पाठवण्याचे आश्वासन आयुक्तांनी यावेळी दिले. महात्मा फ़ुलेनगरमधील नालीवर बांधलेली अनाधिकृत भिंत पाडून तेथील ड्रेनेज लाईनचा साफ़सफ़ाई करण्याचे आदेश आयुक्तांनी यावेळी संबधित यंत्रणेला दिले.

ज्यांच्याकडे ड्रेनेज लाईन नाही किंवा शौचालयाची जोडणी दिलेली नाही, त्यांना प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या आकारणीप्रमाणे हा कर अधिक प्रमाणात लागू शकेल. तसेच अकृषिक कराची पावती व वसुलीसाठी स्वतंत्र व्यक्तीचा खर्च, वेळ टाळण्यासाठी शासन निर्णयानुसार त्याची मागणी बिलात आकारणी केली आहे. मालमत्ताधारकांचे आक्षेप असतील तर हे दोन्ही कर आणि अनाधिकृत बांधकाम शास्ती वगळता निवासी मालमत्ताधारकांना दुपटीपेक्षा अधिक आणि अनिवासी मालमत्ताधारकांना तिपटीपेक्षा अधिक कराची आकारणी झाल्यास मालमत्ताधारकांनी समाधान दौ-याच्या दरम्यान आयुक्तांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नळजोडणी असलेल्या काही नागरिकांना चुकीने लागलेली सामान्य पाणीपट्टी कपात करुन उर्वरीत रक्कम भरुन घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. 31 जानेवारीपर्यंत अकृषिक कर वगळून संपूर्ण मालमत्ता कर भरणा-या मालमत्ताधारकांच्या अकृषिक करासंबधीच्या तक्रारी मनपामार्फ़त तहसील कार्यालयाकडे सोपवल्या जाणार आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी