पहायला गेले, लग्न लावून परतले..!
नांदेड(सुरेश कुळकर्णी)शहरातील मगनपुरा येथील देशपांडे कुटुंबातील मुलासाठी मुलगी पाहण्यासाठी चिखलवाडीत गेलेल्या उपवराकडील मंडळी लग्न उरकूनच परतल्याची घटना आज गुरुवारी (दि.16) घडली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
मगनपुरा भागात रहिवासी तसेच महापालिकेचे कर्मचारी सुरेश कुलकर्णी यांचा भाचा सुजित हा लहान पणापासूनच त्यांच्याकडे राहतो. तो किडस किंगडम शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याच्यासाठी मुलगी पाहायला सुजित याचे माता-पिता (सुभाष व सुरभा देशपांडे) आणि कुलकर्णी कुटुंबीय आज गुरुवारी (दि.16) सकाळी भाग्यनगर येथील उल्हास लाठकर यांची पुतणी तसेच चिखलवाडीतील रहिवासी कै. विश्वनाथराव लाठकर यांची कन्या संध्या हिस पाहण्यासाठी गेले होते. संध्या ही देखील खाजगी नोकरी करते.
उपवर आणि उपवधूकडील मंडळीनी पाहण्याचा कार्यक्रम उरकल्यानंतर पसंतीबद्दल एकमेकांना विचारणा केली. दोन्हीकडील मंडळी तसेच मुलामुलींनी एकमेकांना पसंत असल्याचे सांगितल्यानंतर सुजितचे मामा सुरेश कुलकर्णी यांनी कोणत्याही सोपस्कार आणि हुंड्याशिवाय लगेच लग्न लावण्याचा प्रस्ताव ठेवला. तो दोन्ही बाजूच्या मंडळींनी अगदी आनंदाने स्विकारला. दि. 16 रोजी त्याच बैठकीत आणि त्याच ठिकाणी सुजित व संध्या यांचे शुभमंगल पार पडले. तसेच उभयंतांनी मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या विवाहाची नोंदणी मनपाच्या अशोकनगर क्षेत्रिय कार्यालयात करुन करुन आपले वैवाहिक जीवन सुरु केले. मनपा उपायुक्त रत्नाकर वाघमारे, उल्हास लाठकर, उज्ज्वल लाठकर, उप अभियंता सुनील देशमुख, नरेंद्र सुजलेगावकर, एम. एस. दंडे, नंदकुमार कुलकर्णी यांनी नवदांम्पत्यांचे अभिनंदन करुन पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.