अशोकरावांचा मार्ग मोकळा..?
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण याना दिलासा मिळाल्याचे वृत्त काल सकाळी समाचार प्रभात मध्ये आल इण्डिया रेडिओं वरुन देण्यात आले होते. " आदर्श " घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर कारवाईस नकार देण्याच्या राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी तूर्त न करण्याचे सीबीआयने ठरवल्याने आता विरोधी पक्षाचे नेते कितीही बोंबले तरी अशोक चव्हाण यांच्या अटकेचे संकट टळले आहे. प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार आदर्श घोटाळ्याच्या तपासात चव्हाण यांच्याविरोधात नव्याने पुरावा सापडला तरच त्यांच्यावरील कारवाईचा फेरविचार करण्याची मागणी राज्यपालांकडे करावी, असे मत सीबीआयच्या विधी विभागाने व्यक्त केले आहे. त्यामुळे सीबीआयने विशेष न्यायालयात अशोक चव्हाणांचे नाव आरोपींच्या यादीतून वगळण्याची मागणी केल्याचे समजते.
खरे तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यानी आदर्श प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल फेटाळला होता, त्याच वेळीअशोकरावाना दिलासा मिळाला होता परंतु याच दरम्यान मुंबईच्या महारैलीत नरेंद्र मोदी यांनी यावर टीका करताना राहुल गांधी याना टोमणा मारला होता. त्यानंतर राहुल गांधीना हा वार वर्मी लागल्याने त्यानी " आदर्श " प्रकरणी पृथ्वीराज चव्हाण यांनी हा अहवाल फेटाळल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. परिणामी विरोधी पक्ष व मिडीयाच्या हाती कोलीत मिळाल्याने या विषयावर चर्चा आणि महाचर्चा झडल्या होत्या.आता सीबीआयने स्वत: होऊन अशोक चव्हाण यांचे नाव आरोपींच्या यादीतून वगळण्याची मागणी केली आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांना दिलासा मिळाला आहे. राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करण्याच्या चर्चेला पूर्णविराम देत काँग्रेसने गुरुवारी त्यांच्याकडे आगामी निवडणुकीसाठी प्रचार समितीचे प्रमुखपद सोपवले आहे.यावर संमिश्र प्रतिक्रया आल्या आहेत कांग्रेसच्या दृष्टीने ही निवडणूक जिंकणे सनी त्यासाठी सर्व पर्याय विचारात घेणे गरजेचे असल्याने, महाराष्ट्र राज्यात कान्ग्रेसला मागील लोकसभेपेक्षाही अधिक जागांची गरज निर्माण झाल्याने व ही गरज कांग्रेसची ‘बाबा’ गाडी कितीही वेगाने ढाली तरी पूर्ण करू शकत नाही.विलासराव देशमुख आज हयात नाहीत.मागच्या वेळी अशोक चव्हाण यांनी मुत्सदेगिरीचा वापर करून पक्षाचे लोकसभेतील स्थान मजबूत केले होते.
त्यामुळे भविष्यात मोठी जबाबदारी राहुल गांधी यांच्यावर येऊन पडली आहे या पार्श्वभूमीवर राहुल गांधी प्रचार मोहीम सांभाळत असतना अपयशाचे मानकरी व्हायचे नसतील तर त्याना अशोक चव्हाणासारख्या नेत्याची गरज लागणार आहे अशावेळी केंद्रसरकार कडून सीबीआयच्या रिमोट कंट्रोलची बटणे दाबल्या गेली आहेत.व अशोक चव्हाणांना दिलासा दिला गेला आहे .कदाचित राज्यपालांनाही गृहमंत्र्यांनी कानमंत्र दिला असण्याची शक्यता आहे. आता भाजपा -शिवसेनेच्या नेत्यांनी कितीही बोंबाबोंब केली तरी फारसा फरक पडणार नाही .आणि निवडणुकीत " आदर्श " घोटाळ्यावरून अशोक चव्हाणांवर वार केले गेले तरी कर्नाटकातील येडियुरप्पा यांच्या बाबत जी भुमिका भाजपने घेतली तीच भमिका कांग्रेस पक्षाने अशोक चव्हाणाच्या बाबतीत घेतलेली असल्याने सेना भाजप आपल्या बुडाखाली जळत असताना दुसर्यांचे विझवायला पळू शकत नाहीत. भ्रष्टाचार सर्वव्यापी आणि सर्वच पक्षात व्यापून राहिल्याने व त्या आधारे मिळालेला पैसा वापरून निवडणुका जिंकल्या जात असल्याने, "आदर्श " घोटाळ्याची चर्चा करून फार काही साध्य होणार नाही, हे विरोधी पक्षांनीही ओळखले आहे.विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक होणार आहे. अशावेळी मोदींचा अडसर आम आदमी पार्टी ठरणार असतांना तिकडे कर्नाटकात जर येडियुरप्पा भाजपच्या जागा वाढविणार असतील तर तेच काम काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी अशोक चव्हाण यांच्यावर सोपविले तर त्याला विरोधी पक्ष आवाहन देऊ शकणार नाही. उलट मागच्यावेळी मनसेचा वापर करून अशोकरावांनी लोकसभा निवडणुकांत जी खेळी खेळून विरोधकांचे मतविभाजन घडवून आणले होते तीच खेळी खेळण्यासाठी राज्यात आम आदमीचा वापर ते करू शकतात. अशावेळी त्यांना दिलासा मिळवून देणे भागच असल्याने सारी सूत्रे वरूनच हालली आहेत. आक्रमक राष्ट्रवादीला ‘मवाळबाबा’ निरुपयोगी आहेत याचे गणितही या मागे असू शकते. एकूण काय तर निवडणुका आल्याने जी राजकीय परिस्थिती आणि सामीकरणे तयार होत आहेत त्याचाच एक भाग म्हणून अशोक चव्हाण यांना मिळालेल्या दिलाश्याकडे बघावे लागणार आहे. दाताला चणे हवे आहेत आणि चण्याला दात हवे आहेत.