नांदेड। महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील प्रश्न समजून घेऊन ते दूर करणे यासाठी आमचे शासन कटीबद्ध आहे. मात्र ज्यांना या प्रश्नाच्या आड भारत राष्ट्र समिती याचा प्रचार करायचा आहे. काही विरोधकांना केवळ राजकारण करायचा आहे. अशा राजकीयवृत्तीला संयुक्त महाराष्ट्राची पुरस्कृत जनता थारा देणार नाही. असे मत विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केले ते पत्रकारांशी बोलत होते.
खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर पुढे म्हणाले की, सीमावर्ती भागातील काही प्रश्न निश्चित स्वरूपात समजून घेण्यासारखे आहेत. हे मागील सरकारचे पाप आहे. यातील काही कुटील राजकारणी आता या प्रश्नाच्या आड गळा काढत आहेत. असे असले तरी खासदार या नात्याने नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याशी माझा संवाद झालेला आहे.
जिल्हाधिकारी आणि सीमावृती भागातील प्रश्न मांडणारे प्रमुख समन्वयक गोविंद मुंडकर आणि समन्वयक यांची लवकरच बैठक घेण्याचे नियोजन आहे. महाराष्ट्रातील एकही गाव आणि महाराष्ट्रावर प्रेम करणारे एकही कुटुंब तेलंगणात जाणार नाही. विकासाच्या विषयावर आम्ही सदैव तत्पर आहोत आणि ज्यांना या प्रश्नाच्या आड केवळ राजकारण करावयाचा आहे. त्यांना आमच्याकडे थारा नाही. सीमावर्ती भागातील सुजान जनता अशांना महत्त्व देत नाही.