पार्डी/ नांदेड| "मी लहान असताना आणि मला खूप शिकायची इच्छा असताना, माझ्या मामांनी माझा विवाह निश्चित केला. अनेकदा विनवण्या करूनही माझे कोणी ऐकले नाही. तेव्हा मी धाडसाने आणि "लेक लाडकी" संस्थेच्या मदतीने लग्न रोखले. पण माझ्या जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण प्रचंड आहे. राज्यात आणि देशातही तीच स्थिती आहे. हाच विषयावर मला राहुलजींशी बोलायचा आहे," असे सतरा वर्षाची युवती; सारिका पाखरे (मानूर, जिल्हा बीड ) सांगत होती, पदयात्रेत ती चालत होती.
सामाजिक ज्वलंत प्रश्न प्राध्यान्याने हाताळून समाजात जनजागृती करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्था 'भारत जोडो' यात्रेत जोडल्या गेल्या आहेत. साताऱ्यातील "लेक लाडकी" संस्था ही त्यापैकीच एक. "आमचा भाग दुष्काळी, त्यामुळे ऊसतोड कामगार जास्त. उसतोडीला जात असताना सोबत मुलींना घेऊन न जाता त्यांचे कोवळ्या वयात लग्ने करून आईबाप रिकामे होतात," ती व्याकुळ होऊन व्यथा मांडत होती.
माझ्याप्रमाणेच माझ्या दोन मैत्रिणींचे बालविवाह सुद्धा मी रोखले आहेत. पण हे कायमस्वरूपी रोखून सामाजिक परिवर्तन घडवायचे असेल तर ग्रामीण भागात छोटे छोटे उद्योग उभारले जाणे गरजेचे आहे. त्यातून रोजगार वाढेल आणि आमच्या कुटुंबांचे स्थलांतर थांबेल. स्थलांतर थांबले की मुलींना घरी सुरक्षितपणे वावरता येईल, शिकता येईल मग बाल विवाह सहजपणे रोखता येतील. ही माझीच नव्हे महाराष्ट्रातील माझ्या सारख्या हजारो लेकींची व्यथा आहे. ती राहुलजींना मी सांगणार आहे..."असे सारिका म्हणाली.
शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास नांदेडजवळील दाभाड येथून यात्रा सुरू झाली. तेव्हा संस्थेच्या प्रमुख वर्षा देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली दहा सदस्य सारिका सोबत यात्रेत चालत होते. देशाच्या एकतेचा, अखंडतेचा, बंधुभाव आणि सर्वधर्म समभावाचा संदेशच्या बॅनरचे जॅकेट घालून ते यात्रेत सहभागी झाले आहेत. ते महाराष्ट्रात पुढील 9 दिवस चालणार आहेत.