असा सज्जड इशारा मित्र पक्ष 'काँग्रेस' ला राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी 'शरद युवा संवाद यात्रा' सभेत बोलतांना दिला आहे
राष्ट्रवादीच्या 'शरद युवा संवाद यात्रेस' भोकरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
भोकर, गंगाधर पडवळे। खरे शत्रू कोण व मित्र कोण ? हे न ओळखता जर मित्रपक्षच आमच्याशी 'कुस्ती' खेळण्याचा प्रयत्न करत असेल तर... 'हम तो डुबेगें सनम मगर तुमको को भी साथ लेकर...' असा सज्जड इशारा भोकर मतदार संघात एकहाती सत्ता असलेल्या मित्र पक्ष 'काँग्रेस' ला राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी दि.१८ नोव्हेंबर रोजी भोकर येथे संपन्न झालेल्या 'शरद युवा संवाद यात्रा' सभेत संवाद साधतांना दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते खासदार शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या 'शरद युवा सवांद यात्रेचे' दि.१८ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी भोकर शहरात आगमन झाले. शहरातील आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे दुचाकी, चारचाकी वाहनांच्या मोठ्या ताफ्यात युवकांच्या उत्स्फूर्त सहभागाने व आतिशबाजी करत आलेल्या या भव्य 'शरद युवा संवाद यात्रेचे' माऊली मंगल कार्यालय, किनवट रोड भोकर येथे 'युवा संवाद सभेत' रुपांतर झाले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भोकर शहराध्यक्ष डॉ.फेरोज खान इनामदार यांनी आपल्या प्रास्ताविकातून व युवक चे शहराध्यक्ष अफरोज पठाण यांनी मनोगतातून तालुका आणि शहरातील पक्षस्थितीचा आढावा दिला.तसेच मित्र पक्ष काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री तथा भोकर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार अशोक चव्हाण व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांना मिळत असलेल्या सापत्न वागणूकीविषयी खंत व्यक्त केली.याच बरोबर येथे उच्च शिक्षण व्यवस्था, शेतकऱ्यांसाठी सिंचन व्यवस्था व सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे म्हणून उद्योग उभारले जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. तर चंदन पाटील नागराळकर,निशांत वाघमारे,धनंजय सूर्यवंशी यांनी संवाद सभेस अनुसरुन मनोगत व्यक्त केले.
त्याच खंत व अपेक्षेचा धागा पकडून प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलतांना युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी मित्र पक्ष काँग्रेसला उपरोक्त सज्जड इशारा दिला.तसेच पुढे बोलतांना ते म्हणाले की,भाजपा व त्यांच्या नेत्यांनी गेल्या आठ वर्षांत केवळ भुलथापा आणि आश्वासनाचे 'केळ' दिले असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आता सावध झालं पाहिजे.कारण निवडणूका आल्या की ते जाती धर्माचे मुद्दे पुढे करुन दंगली घडविण्याचा प्रयत्न करतात.तर एम.आय.एम. पक्ष हा 'मोदी इंपोर्टेड मंडळ' झाला आहे. त्यामुळेच या पक्षाच्या एकाही नेत्यास त्यांनी जेलमध्ये पाठविले नाही.मंडल आयोगाच्या विरोधात कमंडल यात्रा काढून ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करणारे हे लोक आज ओबीसींचे आम्हीच तारणहार आहोत असा आव आणत आहेत.
त्यामुळे यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. त्यांना केवळ आणि केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते खा. शरद पवार हेच आव्हान देऊ शकतात.म्हणूनच विविध राज्यांच्या पक्षांनी त्यांचे नेतृत्व मान्य केलं असून विविध विषयांवर ते त्यांचा सल्ला घेतात.त्यांनी आंबेडकरी चळवळीतील नेते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले व आदींना खासदार करुन देशाच्या उच्च सभागृहात पाठविले आहे.यातून ते जातीवादी नसल्याचे सिद्ध होते.अशा दुरदृष्टी असलेल्या नेत्यास व नेतृत्वाखालील पक्षास आपण साथ दिली पाहिजे व पक्षाचे विचार,कार्य,विकासाभिमुख योजनांविषयी जनतेत प्रचार प्रसार सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला पाहिजे,असे ते म्हणाले.
तर अध्यक्षिय समारोपात मोहन पाटील हस्सापूरकर यांनी पक्ष श्रेष्ठी,वरीष्ठ नेते व आपण सर्वांनी आम्हा कार्यकर्त्यांच्या पाठीशी असावं तरच या मतदार संघात पक्ष बळकठीस येईल अन्यथा लयास जाईल,अशी विनंतीपर सुचना केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत युवा कार्यकर्ते खाजा शाकेर खाजा जवाजोद्दीन इनामदार यांनी अनेक युवकांसह राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. सदरील युवा संवाद सभेचे सुरेख असे सुत्रसंचालन अब्दुल सलीम यांनी केले तर उपस्थितांचे आभार गणेश बोलेवार यांनी मानले.