नांदेड| महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे नांदेड केंद्रावर थाटात उद्घाटन झाले. या प्रसंगी उद्घाटक म्हणून जेष्ठ रंगकर्मी सुभाष सारंगधर तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, ललित व प्रयोगजीवी कला संकुल प्रमुख डॉ. पृथ्वीराज तौर, नाट्य परिषद,नांदेड चे अध्यक्षा अपर्णा नेरलकर, जेष्ठ रंगकर्मी लक्ष्मण संगेवार, परीक्षक म्हणून अनिल पालकर (नागपूर), मालती भोंडे (अकोला), राजा राजेशचंद्र (सोलापूर) यांची उपस्थिती होती. नटराज पूजन आणि दीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन झाले.
राम चव्हाण यांनी नाट्य शास्त्र विषयात नुकतीच पी. एच. डी. प्राप्त केल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या प्रसंगी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्ही. सी. च्या माध्यमातून सर्व रंगकर्मी, स्पर्धक यांना शुभेच्छा दिल्या स्पर्धेसंबंधी ज्या काही सकारात्मक सूचना असतील त्याची अंमलबजावणी करण्यात येईल व महाराष्ट्र हि देशाची आर्थिक राजधानी आहे. आता महाराष्ट्र देशाची सांस्कृतिक राजधानी करण्याचा संकल्प करुया असे आव्हान त्यांनी सर्व कलावंताना केले. या प्रसंगी सूत्र संचलन करतांना स्पर्धेचे समन्वयक दिनेश कवडे यांनी नांदेड शहराला आता सांस्कृतिक बाबतीत चांगले दिवस येतील कारण कला प्रेमी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक लाभल्याचा आनंद व्यक्त करत शहरातील शंकरराव चव्हाण सभागुहाच्या दुरावस्थे बाबत लक्ष वेधले. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शंकरराव चव्हाण सभागृहाच्या बाबतीत लवकरच मार्ग काढू असे आश्वासन देत स्पर्धेतील सहभागी स्पर्धक रंगकर्मी यांना शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सिद्ध नागार्जुना मेडिकल असोसिएशन, नांदेडच्या वतीने अभिजित वाईकर लिखित प्रमोद देशमुख दिग्दर्शित “नजरकैद” या गूढ नाट्य प्रयोगाचे सादरीकरण झाले. कथेतील गूढ कायम ठेवत त्यातील रोमांचकारी प्रसंग कसे उठून येतील, प्रत्येक प्रसंग हा प्रेक्षकांना कसा खिळवून ठेवेल याकडे लक्ष दिले आहे. नजरकैद असणारी रागिणी (सारिका चौधरी), इन्स्पेक्टर तपासे (राजकुमार सिंदगीकर) यांच्या प्रत्येक प्रवेशातून ठळकपणे दाखविण्याचा प्रयत्न सफल झाल्याचे जाणवते. एका बाजूला दुष्कृत्ये करणारे कितीही बनवाबनवी करत असले तरी त्याचवेळी देशातील पोलीस यंत्रणा आपला वेगळा गेम खेळत असते आणि कोणत्याही गुन्ह्याचा छडा लावते हे सत्य अधोरेखित करण्याचा प्रयत्न या नाटकातून केला आहे.
या नाटकात प्रमोद देशमुख यांनी साकारलेली राजीव -जॉय ची भूमिका लक्षवेधी ठरली तर त्याच तोडीस तोड पूर्वा देशमुख यांनी रीटा ची भूमिका तितक्याच ताकतीने उभी केली. यात सतिश निशाणकर, बाबू लोखंडे, नागेश कडतन, अश्विनी देशमुख,ऋतुजा रत्नपारखे, चंद्रकांत,वाटोरे, अमरदिपसिंह ठाकूर, गिरीश डोणगावकर यांनी आपल आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला. यातील सुषेन पाटील यांनी साकारलेली पार्श्वसंगीत, राधिका रत्नपारखी, सुरेखा सिंदगीकर यांची वेशभूषा, पंडित तेलंग, संदीप रत्नपारखी यांची प्रकाशयोजना, अनिल खामकर, समर्थ देशमुख यांचे नेपथ्य, प्राची देशमुख, सरिता निशाणकर यांची रंगभूषा हे सर्वच नाटकाच्या आषयानुरूप होते.
स्पर्धेच्या पहिल्याच दिवसी रसिक प्रेक्षकांनीही सभागुहात हाऊसफुल्ल गर्दी केली होती. रंगकर्मी अशोक माडेकर, गोविंद जोशी, राहुल गायकवाड, डॉ. उमेश भालेराव, राहुल जोंधळे, गणेश पांडे, स्वाती देशपांडे यांची उपस्थिती होती. आज दि. १७ नोव्हे. रोजी झपूर्झा फौंडेशन, परभणीच्या वतीने विनोद डावरे लिखित, ऐश्वर्या डावरे दिग्दर्शित “चिरंजीव” या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.