भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम
पुणे| भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित ' पाऊसवेळा ' या पाऊसविषयक कविता,गायन आणि अभिवाचनाच्या संगीतमय कार्यक्रमाला शनीवारी चांगला प्रतिसाद मिळाला.
१९ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम झाला. अनुराधा जोशी निर्मित या कार्यक्रमाचे संशोधन ,संहितालेखन डॉ.वंदना बोकील-कुलकर्णी यांनी केले होते. संगीतसंयोजन ,साथ संगत अनुप कुलथे यांची होती ,केतकी देशपांडे यांनी गायन केले तर गौरी देशपांडे,दीपाली दातार यांनी अभिवाचन केले. काव्य वाचन,गायन ,अभिवाचन असा हा संगीतमय कार्यक्रम होता.हा कार्यक्रम विनामूल्य होता.
या कार्यक्रमात शांता शेळके, मंगेश पाडगावकर, ग्रेस, बा. भ. बोरकर वसंत बापट, इंदिरा संत, ना.धों. महानोरांपासून गदिमा आणि सुधीर मोघें पर्यंत पावसाच्या नादमयी कवितांचे वाचन गौरी देशपांडे, दीपाली दातार यांच्या सह, कार्यक्रमाचे निवेदन करणाऱ्या वंदना बोकील कुलकर्णी यांनी केले.
तर या काव्य वाचना बरोबरच पावसावरील अतिशय तरल, ओथंबणारी लोकप्रिय गाणी तितक्याच मधुरतेने केतकी देशपांडे या गायिकेने गायली, यात घन बरसत आले, पाऊस पहिला जणू कानुला बरसून गेला, या बरोबरच पावसावरील बालगीत टप टप थेंब वाजती, गाणे गातो वारा,ही गाणी केतकीने सादर केली.
केतकी देशपांडे हिने पावसावरील काही बंदिशीही यावेळी सादर केल्या, तर पाडगावकर यांचे "भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसाची" हे गीत केतकीने गाता रसिकांनी प्रचंड टाळ्यांनी दाद दिली. ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १४५ वा कार्यक्रम होता. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले.