मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाचे उदघाटन ज्येष्ठ पत्रकार खा.कुमार केतकर यांच्या हस्ते होणार -NNL

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले,चंद्रकांत पाटील,दीपक केसरकर आदी मान्यवर उपस्थित राहणार


पुणे।
मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उदघाटन ज्येष्ठ पत्रकार,खा. कुमार केतकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,केंद्रीय मंत्री रामदास आठवले आदी मान्यवरांची प्रमुख पाहुणे म्हणून  उपस्थिती लाभणार असून परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषविणार असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी दिली आहे.

  पिंपरी-चिंचवडच्या थेरगाव भागातील शंकरराव गावडे कामगार भवनात सकाळी १०.३० वाजता कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील,शिक्षण मंत्री दीपक केसरकर,खा.श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे,मनपा आयुक्त शेखर सिंह,प्रमोद नाना भानगिरे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. उदघाटनाच्या या सत्रात ज्येष्ठ पत्रकार हेमंत जोगदेव यांना "पवना समाचार" कार भा. वि. कांबळे जीवनगौरव पुरस्काराने

आणि स्वातंत्र्य सैनिक कै.साथी मनोहरपंत चिवटे आरोग्य पत्रकारिता पुरस्कार लोकसत्ताचे पत्रकार संदीप आचार्य यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात चर्चासत्रं, परिसंवाद,मुलाखती आदि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

१९ तारखेला दुपारी ३ वाजता आम्ही अँकर या चर्चासत्रात मराठीतील प्रसिद्ध न्यूज अँकर आपले अनुभव कथन करतील. यावेळी राज्याचे माजी गृहमंत्री, आ.दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते सर्व अँकर्सचा सन्मान केला जाणार आहे. दुपारी ४.३० वाजता खासदार अमोल कोल्हे यांची मुलाखत मिलिंद भागवत आणि विलास बडे घेतील.तर,संध्याकाळी महाराष्ट्राची लोकधारा हा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे.

२० तारखेला सकाळी १०वाजता माध्यमांकडून युवा लोक प्रतिनिधींच्या अपेक्षा हा कार्यक्रम होईल.यामध्ये महाराष्ट्रातील तरूण खासदार, आमदार सहभागी होत आहेत. दुपारी ११.३० वाजता डिजिटल मिडिया प्रिंट मिडियाला आव्हान ठरतोय का ? या विषयावर परिसंवाद होत असून यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत पत्रकार आपली भूमिका मांडणार आहेत.

दुपारी मराठी पत्रकार परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा होत असून त्यामध्ये विविध ठराव संमत करण्यात येतील.तसेच, दुपारी ३ वाजता सांगता समारोप होत आहे.या सोहळ्यास विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोर्हे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार,खासदार सुप्रियाताई सुळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या ऐतिहासिक अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन एस.एम. देशमुख,किरण नाईक,शरद पाबळे,पुणे विभागीय सचिव अरूण तथा नाना कांबळे,पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर,संयोजक बाळासाहेब ढसाळ,तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले आदींनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी