नांदेड| महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेला आता उत्तम दिवस आले असे म्हणायला काहीच हरकत नाही कारण एखाद्या स्पर्धेला रसिक प्रेक्षकांनी उदंड गर्दी करणे आणि कलावंताना दाद देणे हे या स्पर्धेच्या नियोजनाचे यश म्हणावे लागेल. स्पर्धेच्या सहाव्या दिवशी नांदेड केंद्रावर रसिक प्रक्षकांनी तिकिटासाठी एकच गर्दी केली होती. आणि प्रयोगही हाऊसफुल गर्दी केली. स्पर्धेत सहा दिवसात दोन नाटके हाऊसफुल गेले. हे नांदेडकर रसिक प्रेक्षकांचे प्रेम न विसरता येणारे असल्याचे मत समन्वयक दिनेश कवडे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या सहाव्या दिवशी नांदेड केंद्रावर पद्मावती कला अकॅडमी नांदेडच्या वतीने गोविंद जोशी लिखित, दिग्दर्शित “स्पेस” या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण झाले. स्पेस... खरं तर अनेक अर्थांनी वापरला जातो; जसे संधी, अंतर, अंतर हवं, अंतर नको, अंतराळ, क्षेत्रफळ, जागा, वातावरण, मोकळेपणा, रितेपणा. आईच्या पोटात असल्यापासून हा स्पेस आपल्या सोबत आहे, ज्याच्या शोधात तरुणपणी भटकत असतो आपण. मग दारू, पारू (नवीन क्षणिक पार्टनर) किंवा गुरूच्या आहारी जातो आणि मग भकास जगणे सुरू होते. वृद्धापकाळात हा स्पेस मात्र खायला उठतो.
‘स्पेस’मधून मानवी जीवनाच्या सर्व पैलूंवर प्रकाश टाकत, हे लेखन “माणसाला मिळालेला वेळ, स्पेस, साहित्य व ऊर्जा यांचं अयोग्य मिश्रण वेदनादायी जीवन आहे व योग्य मिश्रण जीवन उत्सवी आहे” हे वैश्विक सत्य मांडण्याचा प्रयत्न “स्पेस” या नाटकातून करण्यात आला. या कलाकृतीत अनुष्का देव यांनी आपल्या कवितांचा साज चढवला आणि कलाकृतीच्या सौंदर्यात भर टाकली.
स्पेस हे नाटक याच स्पर्धेत गेल्यावर्षीही सादर झाले होते. गेल्यावर्षीच्या सादरीकरनात आणि आताच्या सादरीकरनात दिग्दर्शक गोविंद जोशी यांनी कमालीचा बदल केला. आणि त्यास रसिक प्रेक्षकांनीही दाद दिली. गोविंद जोशी यांनी साकारलेले मोतीराम आणि रागेश्री जोशी यांनी साकारलेली गीतांजली हे लक्षवेधी ठरले. लेखकच दिग्दर्शक आणि प्रमुख भूमिकेत असल्याकारणाने मोतीराम या पात्रास योग्य न्याय मिळन्यास मदत झाली.
या नाटकाची निर्मिती पद्मावती कला अकॅडमीच्या वतीने करण्यात आली असून प्रा.चंद्रकांत पोतदार हे निर्माते व सौ. वैशाली गुंजकर या सहनिर्माती आहेत. यात (अभिनेत्री शरयु) - अनुराधा पांडे, (डॉ.संध्या) - मिनाक्षी पाटील, (अॅड.क्रांती) - डॉ. भारती मढवई, (आरती) - भारती नवाडे, (सूरज) - विवेक भोगले, पदार्थ - (स्वाती) - मंगला खानापुरे, (शांकरी) - नेहा खडकीकर, (वेदिका) - जयश्री पाटील, (गितांजली) - वैशाली गुंजकर या कलावंतानी भूमिका साकारल्या या नाटकाची प्रकाश योजना - अशोक माढेकर, नैपथ्य - अभिनव जोशी, रंगभूषा - अर्चना जिरवनकर, वेशभूषा - निकिता पाटील, संगीत - कमलेश सारंगधर यांनी उत्तम साकारले.
दि. २२ नोव्हेंबर रोजी कोणतेही नाट्य प्रयोग सादर होणार नसून उद्या दि. २३ नोव्हेंबर रोजी क्रांती हुतात्मा चॅरिटेबल ट्रस्ट, परभणीच्या वतीने रविशंकर झिंगरे लिखित, दिग्दर्शित “सृजन्मयसभा” या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.