नांदेड| समाजातील विविध विषयांना स्पर्श करत महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नाट्य प्रयोगांचे सादरीकरण होत आहेत. स्पर्धेच्या चौथ्या दिवशी जनजागृती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, मुदखेड च्या वतीने आकाश भालेराव लिखित, दिग्दर्शित “नाच्याच लग्न” या विनोदी नाट्य प्रयोगाचे सादरीकरण झाले. नाटक विनोदी पद्धतीने असले तरी तृतीय पंथीयांचे प्रश्न या नाटकातून मांडण्यात प्रयत्नही करण्यात आला.
या नाटकातील बहुतांश कलावंत पहिल्यांदाच हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या मंचावर सादरीकरण करत होते. त्यांच्या सादरीकरणाने मात्र सभागृहात हास्याची लहर उमटत होती. रसिक प्रेक्षकांनी नाटकाचा मनमुराद आनंद घेतला हे नक्की. सचिन वानोळे यांनी साकारलेल्या “लोच्याच्या” भुमिके भोवती हे नाटक फिरत होते. यातील सुमित साळुंके यांनी साकारलेला “बोबड्या” लक्षवेधी ठरला. तर दिलीप इजगरे,आनंद बसवंते, मारोती शिरसाट, आकाश भालेराव, दिपाली अंबटवार, दिपाली जोशी, नितीन भालेराव यांनी आप आपल्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. या नाटकाची प्रकाशयोजना – अंकुश शिंदे, नेपथ्य- नितेश ठाकूर यांनी साकारले.
उद्या दि. २० नोव्हे. रोजी पद्मावती कला अकॅडमी, नांदेडच्या वतीने गोविंद जोशी लिखित, दिग्दर्शित “स्पेस” या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी समन्वयक दिनेश कवडे, स्वाती देशपांडे, सुधांशू सामलेट्टी, किरण टाकळे, स्नेहा बिराजदार, राम चव्हाण हे काम पाहत आहेत.