थकीत वेतन,कामावर घ्यावे आणि दफ्तर दिरंगाई कायद्यानुसार अधिकाऱ्यावर कारवाई करावी
नांदेड। सीटू संलग्न वन कामगार कर्मचारी संघटनेचे बेमुदत उपोषण व धरणे आंदोलन दिनांक १७ ऑक्टोबरपासून उपवनसंरक्षक कार्यालयासमोर सुरु आहे. ज्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी सोईनुसार लाभ घेऊन वरिष्ठांना चुकीचा अहवाल पाठवून जंगल खात्यामध्ये शासकीय नोकऱ्या अनेक लोकांना मिळवून दिल्या आहेत. परंतु जे कामगार सन १९९१ पासून वन मजूर म्हणून काम करतात त्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले आहे.
या सर्व तत्कालीन वन अधिकाऱ्यांवर वनविकास महामंडळ कंपनी ऍक्ट १९६६ च्या कलम १६६ नुसार व शासकीय कर्तव्य पार पाडण्यात होणाऱ्या विलंबास प्रतिबंध (दप्तर दिरंगाई कायदा २००५) नुसार कारवाई करावी अशा मागण्या सीटू च्या वतीने निवेदनाद्वारे यापूर्वीच केल्या आहेत. निवेदनाच्या प्रती मुख्य वनसंरक्षक महाराष्ट्र राज्य नागपूर यांनादेखील पाठविल्या असल्यामुळे उप वनसंरक्षक कार्यालयामध्ये या गंभीर तक्रारी बद्दल उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. सीटूचे जनरल सेक्रेटरी तथा वन कामगार कर्मचारी युनियनचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड यांनी उपस्थित ऊपोषणार्थी वन मजुरांचे मस्टर, वन अधिकाऱ्यांनी घेतलेले जबाब व थकीत वेतन देणार असल्याचे वन अधिकाऱ्यांनी यापूर्वी दिलेले पत्रे.उप वन संरक्षक यांना सादर केली आहेत.
जिल्ह्यातील वन मजुरांना सेवाज्येष्ठतेनुसार कायम केले नसून वन अधिकाऱ्यांनी भ्रष्ट मार्गाने शासकीय सेवेत कायम करण्यासाठी खोटे व चुकीचे अहवाल शासनास पाठवून शासनाची दिशाभूल आणि वनमजुरांची फसवणूक केली आहे. मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनास दिनांक १९ ऑक्टोबर रोजी अ. भा.जनवादी महिला संघटनेने पाठिंबा देत तीव्र निदर्शने करीत जोरदार घोषणाबाजी करत वनविभागाचा काळाबाजार चव्हाट्यावर आणला आहे. वन कामगार कर्मचारी संघटनेच्या आंदोलनाची दखल उप वनसंरक्षक श्री केशव वाबळे यांनी घेतले नाही तर वन मजुरांची दिवाळी गोड होणार नाही हे निश्चित आहे आणि मजुरांची दिवाळी गोड होत नसेल तर दिवाळीच्या दिवशी वन विभाग कार्यालय पुढे सिमगा करणार असे मनोगत कॉ.गायकवाड यांनी व्यक्त केले.
सायंकाळी उप वनसंरक्षक वाबळे हे शिष्टमंडळाशी चर्चा न करताच निघून गेल्याने आंदोलक थेट उपवन संरक्षकयांच्या कक्षापुढे गेले होते.तेव्हा वजिराबाद पोलिसांचा फौजफाटा वन विभाग कार्यालयात दाखल झाला आणि सहायक पोलीस निरीक्षक आगलावे यांच्या प्रयत्नातून उप वनसंरक्षक वाबळे यांच्या कक्षात शिष्टमंडळासोबत चर्चा झाली. तेव्हा वन परीक्षेत्र अधिकारी माहूर यांना तातडीने दिवाळी पूर्वी वेतन अदा करावे आणि उपोषणार्थी सर्व वन मजुरांना कामावर घ्यावे असे निर्देश उपवनसंरक्षक यांनी दिले.
आंदोलनाचे नेतृत्व युनियन अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड सीटू जिल्हाध्यक्षा कॉ.उज्ज्वला पडलवार यांनी केले. तर अ. भा.जनवादी महिला संघटनेच्या जिल्हा निमंत्रक कॉ.करवंदा गायकवाड,तालुका अध्यक्षा कॉ. लता गायकवाड, कॉ.गंगासागर गायकवाड,अश्विनी दरोडे यांनी वन मजूरांच्या मागण्यांना पाठिंबा देत तीव्र निदर्शने केली. आंदोलन यशस्वी करण्यासाठी मधुकर राठोड,सजूबाई राठोड, कमळाबाई राठोड,डीगांबर टेंबरे,उत्तम साखरे, माधव धुपे,शकुंतला कोठेकर, कॉ.जयराज गायकवाड,शकीला बी शेख युनूस,कॉ.चंद्रकांत लोखंडे,साहेबराव दूमारे,भीमराव सिडाम, साईनाथ टेंबरे,गजानन पीसाळकर,अर्चना नटवे,श्रावण वायफळे, परमेश्वर भडंगे,कैलास कोठेकर,दिलीप पाईकराव कॉ.श्याम सरोदे,मीराबाई कोहचाडे, रेखा पवार, रमेश वाघमारे आदींनी परिश्रम घेतले. मागण्यांची पूर्तता झाली नाही तर वन विभाग कार्यालयात घेराव घालणार असल्याची प्रतिक्रिया कॉ.उज्ज्वला पडलवार यांनी दिली आहे.