नांदेड। यशाची वाट प्रतिकूल परिस्थितीतून जात असते. प्रतिकूल परिस्थितीला घाबरून पळ न काढता परत प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्या क्षमता कौशल्यांचा वापर करा. वेदना होत असतानाही थांबू नका. वेदनेतूनच यशाचे वेद लिहिले जातात. ’या शिवाजीराव भोसले अन् व्हा छत्रपती’ असे कोणी म्हणत नाही, छत्रपतींचा मार्ग काटेरी असतो, असे प्रतिपादन व्यक्तिमत्व विकासतज्ज्ञ तथा साहित्यिक डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे यांनी केले. ते नांदेडच्या नवा मोंढा येथील मराठा मुलींच्या वसतिगृहात यशाचे सूत्र याविषयावर आयोजित व्याख्यानाचे प्रमुख वक्ते या नात्याने बोलत होते.
विचारपीठावर अध्यक्षस्थानी इंजि. शे.रा. पाटील, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नानाराव कल्याणकर, उपक्रमशील शिक्षक रमेश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रतिमापूजन आणि जिजाऊ वंदनेने व्याख्यानास प्रारंभ करण्यात आला. डॉ. हनुमंत भोपाळे पुढे बोलताना म्हणाले,’ ध्येयनिश्चित करून प्रयत्नांची पराकाष्ठा करा. द्विविधा अवस्थेत वेळ वाया घालवू नका. रोज दोन मार्काची तयारी केली तर तीनशे साठ दिवसात सातशे वीस मार्काची तयारी होते.
यशासाठी चालढकल चालत नाही. आळस करणारे यशाच्या कळसावर पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे ध्येयावर प्रेम करत मनापासून आपल्या सर्व क्षमता आणि कौशल्याचा वापर केल्यास यशापासून जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. पुस्तकातील एक एक ओळ समजून घेत, अभ्यास विषय लक्षात ठेवत मन लावून अभ्यास केल्यास यश नक्कीच मिळते असे प्रतिपादन डॉ.हनुमंत भोपाळे यांनी केले.
शेवटी त्यांनी विद्याथिर्र्ंनींच्या मनात सलणार्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊन समाधान केले. मराठा सेवा संघाच्या वसतिगृहात ग्रंथालयासाठी यशाचा राजमार्ग ह्या ग्रंथाच्या आठ प्रती भेट म्हणून दिल्या. वक्त्यांचा परिचय रमेश पवार यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानाराव कल्याणकर यांनी केले.