राष्ट्रीय महामार्ग ठेकेदारच्या नाकर्तेपणामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे
हिमायतनगर| शहरातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील ४ वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे, त्यामुळे दिवसेंदिवस अपघाताची मालिका सुरूच आहे. मागील १५ दिवसापूर्वी एका युवकांचा अपघातात मृत्यू झाला, त्यानंतर तीन आघात झाले. त्यानंतर आज पुन्हा एका अपघात झाला असून, या अपघातात हिमायतनगर तालुक्यातील सवणा ज. येथील तरुण शेतकरी जागीच ठार झाला असल्याने गुत्तेदाराच्या नाकर्तेपणाबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
हिमायतनगर शहराची बाजारपेठ मोठी असून, येथे रेल्वे स्थानक असल्यामुळे या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या नागरिकांसह वाहनधारकानाची मोठी वर्दळ रात्रंदिवस सुरूच असते. मागील ४ वर्षापासुन हिमायतनगर शहरातून धानोडा ते भोकर हा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. हिमायतनगर रेल्वेगेटपासून ते भोकर पर्यंतचे काम ठेकेदाराने वर्षभरात पूर्ण केले. मात्र हिमायतनगर रेल्वे गेट ते किनवट पर्यंतचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून ४ वर्षापासन संत गतीने काम सुरु ठेवले आहे. त्यामुळे वाहनधारकांना जीवघेणा प्रवास करावा लागत असून, काम सुरु झाल्यापासन आत्तापर्यंत या रस्त्यावर १० ते १५ जणांचा मृत्यू अपघात होऊन झाले आहेत. तरीदेखील ठेकेदाराने रस्त्याच्या कामाला गती दिली नसल्याने दिवसेंदिवस अपघात होताच आहेत.
अपघाताला कारणीभूत ठीकठिकाणी ठेवलेले रस्त्याचे अर्धवट काम आणि रस्त्यावर पडलेले खड्डे आहेत असे नागरिक सांगत आहेत. त्यात भर म्हणून हिमायतनगर शहरातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याची रुंदी कमी करून डिव्हायडर गायब करण्याचा प्रताप राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने अभियंत्याला हाताशी धरून केला आहे. यामुळे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत असून, ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मागील घटनांनंतर पुढे येऊ लागली आहे. या संदर्भात अनेकांनी ठेकेदाराच्या विरोधात तक्रारी दिल्या असल्या तरी हिमायतनगर पोलीस ठाण्यात त्या चौकशीवर ठेवण्यात आल्या आहेत.
आज दि.२९ ऑक्टॉबर रोजी सकाळी हिमायतनगर शहरातील 132 के.व्ही. केंद्राजवळ अपघात झाला आहे. या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाला लागून सवना गावाकडे जाणारा रस्ता आहे. सवना ज. येथील तरुण शेतकरी संदीप सटवाजी शेंडगे वय 28 वर्ष हे हिमायतनगर येथून आपल्या गावाकडे जात होते. दरम्यान येथील अर्धवट कामामुळे आणि येथे डिव्हायडर व स्पीड ब्रेकर नसल्यामुळे रोड क्रॉस करून जात असताना समोरून वाहन येऊ लागतात पुन्हा आपल्या बाजुला दुचाकी घेतांना तोल गेल्याने दुचाकीं खड्ड्यात जाऊन अपघात झाला असल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी सांगितले आहे.
दरम्यान या अपघात बाबत फिर्यादी बालाजी गंगाराम शेंडगे वय 52 शेतकरी, रा जकापुर, भोकर यांनी दिल्यावरून मयत पुतण्या हा दुचाकीवर सवना गावाकडे जाताना नाल्यात पडून डोक्याला तोंडाला जबर मार लागल्याने गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला, याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अशी माहिती सहाययक पोलीस पोलीस निरीक्षक बालाजी महाजन यांनी दिली.