हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील एकंबा - सिरपल्ली - डोल्हारी - पळसपूर - हिमायतनगर - पार्डी - एकघरी रस्त्याच्या कामाची संत गती आणि गुत्तेदाराकडून अभियंत्या कडून होत असलेली पाठराखण यामुळे रस्त्याची गुणवत्ता ढासळली आहे. या थातुर माथूर पंतप्रधान ग्रामसडक रस्त्याची उच्चस्तरीय चौकशी करून गुत्तेदारावर दंडात्मक कार्यवाही करून वापरण्यात आलेले निकृष्ट साहित्य उखडून नव्याने गुणवत्तापूर्ण रस्ता करण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे.
तालुक्यातील एकंबा - सिरपल्ली - डोल्हारी - पळसपूर - हिमायतनगर - पार्डी - एकघरी या ११.९९० किमी रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ७३० लक्ष रुपयांच्या निधी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून उपलब्ध करून देण्यात आला. एव्हडेच नाहीतर पुन्हा ५ वर्ष देखभाल दुरुस्तीसाठी ५० लक्ष रुपयाचा निधीची तरतूदही यात करण्यात आली आहे. या रस्ता कामाचे उदघाटन खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते आ.माधवराव पाटील जवळगावर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सदरील काम ठेकेदार में एम एस सिद्दीकी, औरंगाबाद यांच्यामार्फत केले जात आहे. या कामाला दि. ७ जानेवारी २०२२ ला सुरुवात झाली. मात्र ठेकेदारने संत गतीने आणि निकृष्ट पद्धतीने काम सुरु केले त्यामुळे ८ महिने उलटले तरी अद्यापही या रस्त्याचे काम अर्धेदेखील झाले नाही.
या कामाची गुणवत्ता ढासळली त्यामुळे नागरिकांनि केलेल्या तक्रारीनंतर मटेरियल रिजेकट (रद्द) करण्यात आले होते. काही दिवस ठेकेदारने काम बंद ठेऊन देखरेख करणारे अभियंता सुधीर पाटील यांच्या आशीर्वादाने रद्द केलेल्या गिट्टीचा वापर करून थातुर माथूर रस्ता करण्याचा घाट रचला आहे. त्यामुळे या भागातील नागरिक गुत्तेदाराच्या निकृष्ट कामाबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून गुत्तेदाराचे नाव काळ्या यादीत टाकावे आणि गुत्तेदारास अभय देणाऱ्या अभियंत्यास बडतर्फ करावे अशी मागणी विकासप्रेमी जनतेतून केली जात आहे.