नाशिक अपघातातील जखमींचा सर्व खर्च सरकार करणार - मुख्यमंत्री शिंदें
बस दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये मदत देणार
नाशिक| नाशिक ते औरंगाबाद मार्गावर हॉटेल मिरचीजवळ एका खासगी बसचा आज सकाळी मोठा अपघात झाला. अपघातानंतर या बसमध्ये आग लागल्याने अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेत 12 प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. यात जवळपास 38 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही बस यवतमाळवहून मुंबईला जाणारी खासगी बस असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या अपघाताची माहिती मिळताच मनमाड व मालेगावचे अग्निशमन दल घटना स्थळी दाखल झाले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच बस दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये मदत देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. अपघातातील प्रत्येक जखमीची केली आस्थेवाईकपणे विचारपूस केली सर्वांना वेळेत, संपूर्ण उपचार दिला जाणार असून, त्यांनी दुर्घटनास्थळाची भेट देऊन पाहणी केली.
सप्तशृंगी गड येथे ग्रामपंचायतच्या टोलनाक्याच्या जवळ महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. एसटी बस पिंपळगाव बसवंत डेपोची होती. (बस क्रमांक एम एच 14 बीटी 3752) प्रसंगावधान राखून चालक आणि वाहक यांनी सर्व 33 प्रवाशांना खाली उतरवले. यात्रा नियंत्रण समितीने तातडीने तेथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक स्वयंसेवक, विश्वस्त संस्थेचे सुरक्षा कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ, रोप वे कर्मचारी आदी यांना तातडीने घटनास्थळी पाचारण करून फायर एक्स्टिंविशर द्वारे तातडीने आग विझविली. सर्वांनी प्रसंगावधान राखून वेळीच उपाययोजना योग्य प्रकारे राबविल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेमध्ये कुठल्याही भाविकाला अथवा कर्मचाऱ्याला कोणत्याही प्रकारे इजा झालेली नसून सर्व सुरक्षित आहेत. भाविकांनी कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन जिल्हा महसूल, पोलीस व ट्रस्ट प्रशासन तसेच स्थानिक ग्रामपालिका तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
नाशिक येथील बस दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हळहळ व्यक्त केली आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले, त्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले. तसेच, पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीतून मृतांच्या नातेवाईकांनी 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजारांची मदत करण्याचा निर्णयही घेतल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले आहे. याबाबतचे ट्विट पंतप्रधान कार्यालयाने केले आहे.
नाशिक अपघातातील जखमींचा सर्व खर्च सरकार करणार - मुख्यमंत्री शिंदें
काळजी करू नका, घाबरू नका, सर्वकाही ठीक होईल,अशा दिलासादायक शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नाशिक येथील खासगी बसच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना धीर देत विश्वास दिला. नाशिक -औरंगाबाद रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात खासगी प्रवासी बस जळून 12 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर काही प्रवासी किरकोळ व गंभीर जखमी झालेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने आज शासकीय रुग्णालयात दाखल प्रत्येक जखमी व त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली. यावेळी धीर देताना ते बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, आज पहाटे घडलेली घटना अत्यंत दुर्देवी आहे. अशा परिस्थितीत अपघातग्रस्त प्रवासी व त्यांचे नातेवाईकांच्या सोबत शासन आहे. जिल्हा रुग्णालय व इतर रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना सर्व वैद्यकीय सेवा तातडीने उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच या अपघातात मृत पावलेला प्रवाशांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली असून जखमींचा सर्व वैद्यकीय खर्च शासन करणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. त्या आधी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दुर्घटना स्थळास भेट दिली.
ही टीम देतेय उपचार…
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अस्थिव्यंग तज्ज्ञ विभाग प्रमुख डॉ.गोपाळ शिंदे यांच्यासह चार अस्थिव्यंग तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक. शल्य चिकित्सक डॉ.भामरे यांच्या नियंत्रणाखाली 3 शल्य चिकित्सक डॉक्टरांचे पथक, भूलतज्ज्ञ डॉ. सचिन पवार त्यांच्या नियंत्रणाखाली 2 भूलतज्ज्ञ, 2 न्यायवैदिक तज्ज्ञ, 4 अपघात वैद्यकीय अधिकारी असे एकूण 19 वैद्यकीय पथकासह आपत्कालीन कक्षाच्या सर्व अधिकारी, कक्षाच्या मेट्रन व वर्ग चार चे सर्व कर्मचारी सेवा देत आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असून एका गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णाला पुढील उपचारासाठी डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात 108 रुग्णवाहिकेने दाखल करण्यात आले आहे. या बस अपघातात 12 मृत्यू, चार घरी सुखरुप पोहचले असून व्हिजन हॉस्पिटलमध्ये दोन रुग्ण उपचार घेत आहेत. पंचवटीतील सिल्वर हॉस्पिटलमध्ये पाच रुग्ण, सुविधा हॉस्पिटलमध्ये एक, जिल्हा रुग्णालयात एकूण 31 जखमी प्रवासी उपचार घेत आहेत.