सप्तरंगी साहित्य मंडळाची ६० वी काव्य पौर्णिमा रंगली, दीपक नगरच्या महिला मंडळाचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नांदेड| भीमाची पाखरं पळायला लागली, लोकांच्या जात्यावरी दळायाला लागली या ज्येष्ठ कवी थोरात बंधू यांच्या कवितेने अंतर्मुख करीत दोन तास चाललेल्या कविसंमेलनात चांगलीच रंगत आणली. भाद्रपद पौर्णिमेनिमित्त घेण्यात आलेल्या कविसंमेलनात ज्येष्ठ ग्रामीण कवी नागोराव डोंगरे, भीमशाहीर आ. ग. ढवळे, युद्धकवी प्रशांत गवळे, मंडळाच्या ज्येष्ठ कवयित्री उषाताई ठाकूर, ज्येष्ठ साहित्यिक तथा कवी अनुरत्न वाघमारे, आंबेडकरी कवी थोरात बंधु, काव्यपौर्णिमेचे संकल्पक प्रज्ञाधर ढवळे, मुकुंद एडके, मोतीराम साखरे, लोकगायक पंडित नरवाडे आदींनी सहभाग घेतला होता. काव्य पौर्णिमेच्या अध्यक्षस्थानी सप्तरंगी साहित्य मंडळाचे अध्यक्ष अनुरत्न वाघमारे हे होते.
येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने भाद्रपद पौर्णिमेच्या निमित्ताने शहरातील दीपकनगरस्थित बुद्ध विहारात ६० व्या काव्य पौर्णिमेचे आयोजन करण्यात आले होते. या विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथाचे वाचन सुरू आहे. वर्षावास पावनपर्वावर साजऱ्या झालेल्या कविसंमेलनाने काव्य पौर्णिमेचे महत्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच म. फुले, सावित्रीबाई फुले, माता रमाई यांच्या प्रतिमांचे दीप धूप आणि पुष्प पूजन करण्यात आले. त्यानंतर त्रिरत्न वंदना आणि पूजापाठ संपन्न झाला. यावेळी महिला मंडळाच्या वतीने खीर दान कार्यक्रम घेण्यात आला.
कविसंमेलनात एकापेक्षा एक सरस आणि दमदार कविता सादर करुन सहभागी कवी कवयित्रींनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रज्ञाधर ढवळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रशांत गवळे यांनी केले तर आभार थोरात बंधू यांनी मानले. काव्य पौर्णिमेच्या यशस्वीतेसाठी सूर्यकांता लोणे, चंद्रकला विनायते, सुमनबाई भवरे, सुजाता कदम, मिना आळणे, दैवशाला आळणे, छायाबाई गोंदणे, वच्छलाबाई नरवाडे, रंजना नरवाडे, उज्वला खिराडे, अंतकला बिऱ्हाडे, सविता जोंधळे, लक्ष्मीबाई कांबळे शालिनी वाठोरे यांनी परिश्रम घेतले.