ज्येष्ठ नागरिकांची ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
नांदेड| घटनेप्रमाणे ज्येष्ठ नागरिक धोरण अंमलात आणून ज्येष्ठ नागरिकांची वर्यामर्यादा 60 वर्षे करून त्यांना दरमहा किमान 3500 रूपये मानधन देण्यात यावे, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ.हंसराज वैद्य यांनी नव्या सरकारकडे केली आहे.
नुकताच आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष साजरा केला. आम्ही एकूण जनसंख्येच्या 18 टक्के ज्येष्ठ नागरिकांनी सुध्दा घर घर तिरंगा लावून अमृत वर्ष साजर करण्यात हिरीरीने भाग घेतला. भव्य तिरंगा रॅली काढल्या. ज्येष्ठ नागरिकांनी स्वातंत्र्य लढ्यातही भाग घेतलेला आहे. राष्ट्र उभारणीतही आमचा सिंहाचा वाटा आहे. प्रत्येक राष्ट्रीय कार्यक्रमात व प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीतही ज्येष्ठ नागरिक शंभर टक्के भाग घेत आहेत. आता वयोमानानुसार आमच्या शरिरात ताकद तथा त्राण राहिलेला नाही. आम्ही सध्या कमविते राहिलो नाहीत. आर्थिक व्यवहारही हाती राहिला नाही. पोटात भूक लागलेली असूनहीं रोटीसाठी आम्हांला दुसर्याच्या हाताकडे बघावे लागते ही वस्तुस्थिती आहे. मधुमेह, संधीवात, दमा, बहिरेपणा, स्मृतीभ्रंश, अंधपणा आदि अनेक व्याधींनी आम्ही पोडित आहोत. अन्न, पाणी, वस्त्र, निवारा, औषधी साठी सुध्दा आज आम्ही मोताज आहोत. आज आम्ही हतबल झालेले आहोत.
मुलं-सुनां भीकही मागू देत नाहीत आणि समाजही भीक घालत नाही. केवळ मृत्यूची वाट पहात जगत आहोत. विष प्राशन करून मृत्यूला कवटाळावे तर विष विकत घेण्यासाठीही आमच्याकडे पैसा नाही. आपल्या संविधानाच्या (घटनेच्या) 41 व्या कलमानुसार अनेक वर्षापासून न्याय मागत आहोत. आमची बरीच संख्या ’दयावान करोना साथी’च्या काळात घटली आहे. आता आम्ही जेवढे ज्येष्ठ नागरिक जिवंत शिल्लक राहिलो आहोत, किमान आम्हाला तरी हे नविन सरकार न्याय देईल अशी आम्हा ज्येष्ठांची रास्त अपेक्षा आहे. आजपर्यंत या पुरोगामी महाराष्ट्र राज्यात अनेक सरकारे आली व गेली. ज्येष्ठांना न्याय मिळालेला नाही.
आमच्या अनेक वर्षापासूनच्या जुन्याच मागण्या आहेत. 1. घटनेप्रमाणे ज्येष्ठ नागरिक धोरण अंमलात आणण्यात यावे. 2. इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा 60 वर्ष मान्य करण्यात यावे व अंमलात आणण्यात यावी. 3. इतर शेजारील राज्याप्रमाणे फक्त गरजू, वंचित, दुर्लक्षित, शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी,कामगार ज्येष्ठ नागरिकांना किमान 3500 रु.प्रतिमहा मानधन देण्यात यावे. अशी आमची माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणविस साहेबांना ज्येष्ठांची नम्र विनंती. साहेब, आपण परत येणार-येणार म्हणत होतात. आम्ही खरच देव पाण्यात ठेवून आपली आपण परत यावेत म्हणून वाट पहात होतो. आपण परत आलातही. आता सत्तेत आलात. आज आपणं नांदेड मध्ये आलेले आहात. आता येत्या हिवाळी अधिवेशनात तरी आमच्या जुन्या मागण्याचा सहानुभूतिपूर्वक विचार करा. आम्हा ज्येष्ठांची व आमच्या मागण्यांची कदर करा बस्स एवढेच.!!