नांदेड| कार्यालयीन कामांमध्ये दिवसेंदिवस बदल होत आहेत. पेपर कडून पेपरलेस कडे वाटचाल होत आहे. या सर्व बाबींचे अद्यावत ज्ञान कर्मचाऱ्यांना असणे आवश्यक आहे.त्यामुळे कर्मचाऱ्यांनी स्वतःला अद्यावत ठेवले पाहिजे आणि त्यासाठी नियमितपणे प्रशिक्षण घेतले पाहिजे असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी व्यक्त केले.
ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि पुणे येथील यशदा सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिक्षकेतर अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या उद्घाटन प्रसंगी त्यांच्या समवेत व्यासपीठावर विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.दिगंबर नेटके, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठता डॉ. एल. एम. वाघमारे,कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. डी. एम. खंदारे, डॉ. बालाजी मुधोळकर, पुणे येथील यशदा सेंटर मिडिया अँड पब्लिकेशनचे प्रमुख डॉ. बबन जोगदंड, अमरावती येथील वरिष्ठ वित्त अधिकारी डॉ. वैशाली दुधे, मुंबई येथील संगीत तज्ज्ञ डॉ. संतोष बोराडे, यांची उपस्थिती होती.
दि.१२ सप्टेंबर रोजी उद्घाटनानंतर दुसऱ्या सत्रामध्ये अमरावती येथील आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ वित्त अधिकारी डॉ. वैशाली दुधे यांनी ‘कार्यालयीन व्यवस्थापन आणि अहवाल व टिपणीचे सादरीकरण’ या विषयावर मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रामध्ये पुणे येथील यशदा सेंटरचे मीडिया अँड पब्लिकेशनचे प्रमुख डॉ.बबन जोगदंड यांनी ‘कार्यालयीन व्यवस्थापनेमधील होत असलेले बदल’ या विषयावर पीपीटीद्वारे आपल्या मार्गदर्शनाचे सादरीकरण केले. चौथ्या सत्रामध्ये मुंबई येथील डॉ. संतोष बोराडे यांनी ‘संगीताद्वारे तणाव मुक्त होणे’ या विषयावर व्याख्यान दिले. दि.१३ सप्टेंबर रोजी पुणे येथील श्याम भुरके यांनी ‘तणाव व्यवस्थापन आणि ध्यान साधना’ यावर व्याख्यान दिले. दुसऱ्या सत्रात पुणे येथील प्रशांत साठे यांनी ‘कर्मचाऱ्यांचे समाज व्यवस्थेतील विकास कामात सहभाग’ यावर मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात श्याम भुरके यांनी ‘काम आणि जीवन’ या विषयावर मार्गदर्शन केले. चौथ्या सत्रात पुणे येथील डॉ. आर. डी. कांकरिया यांनी ‘व्यवस्थापनेतील शास्त्रोत्तर अभ्यास’ या विषयावर मार्गदर्शन केले.
दि.१४ सप्टेंबर रोजी विद्यापीठातील मानव्यविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अजय टेंगसे यांनी ‘नवीन शैक्षणिक धोरण’ या विषयावर आपले मत मांडले, दुसऱ्या सत्रात औरंगाबाद येथील केदार खामितकर यांनी ‘विज बचत आणि व्यवस्थापन’ या विषयावर आपले मत मांडले. कार्यक्रमाच्या शेवटच्या समारोप सत्रात नांदेड येथील प्रसिद्ध हिंदी कवी प्रकाश नेहलाणी यांनी त्यांच्या काही कवितांचे सादरीकरण केले.आणि त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप घेण्यात आला. या प्रशिक्षणामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. हे प्रशिक्षण यशस्वी करणेसाठी प्रशिक्षण शिबिर कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. डी. एम. खंदारे, डॉ. बालाजी मुधोळकर, यांच्यासमवेत उपकुलसचिव व्यंकट रामतीर्थे, डॉ. श्रीकांत अंधारे, डॉ. दिगंबर तंगलवाड, रामदास पेदेवाड, लक्ष्मीकांत आगलावे, उद्धव हंबर्डे, हरीश पाटील, शिवाजी चांदणे, मधुकर आळसे, शिवाजी कल्याणकर यांनी विशेष परिश्रम घेतले.