नांदेड। कोराना काळात नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेंनी आँनलाईन शिक्षण,घरोघरी भेटीच्या माध्यमातून शिक्षण आणि अत्यंत कल्पकतेने विद्यार्थ्यांना अध्यापन केले. त्याचाच परिणाम म्हणून कोरोना नंतर जिल्हा परिषद शाळेंची विद्यार्थी संख्या झपाट्याने वाढलेली दिसत आहे. हळूहळू पालकांचा कल जिल्हा परिषद शाळेंकडे वळत आहे. त्याचाच सुपरिणाम म्हणजे आज प्रत्येक जि.प.च्या शाळेचा पट कमालीचा वाढलेला दिसत आहे.
संस्कार, गुणवत्ता व प्रगती या तीन ब्रीद्रचे उपयोजन करुन जिल्हा परिषद विष्णुपूरी प्रशाला नेहमीच विद्यार्थी गुणवत्तेबाबत अग्रणी राहीली आहे. कोरोना काळानंतर या शाळेचा पट तेराशे विद्यार्थ्यांचा झाला असून इयत्ता पहिले ते दहावीच्या मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग या शाळेत अत्यंत यशस्वीपणे चालत आहेत. केवळ पट वाढला तरी गुणवत्ता वृद्धिही झाली पाहिजे, याच विचाराच्या माध्यमातून नेहमीच येथील शालेय व्यवस्थापन समिती विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात व यशस्वी करण्यासाठी प्रयत्नरत असते.
त्याचाच एक भाग म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास आबासाहेब देशमुख हंबर्डे यांनी नेमका विद्यार्थी गुणवत्तेत किती प्रगत आहे, याच्या अवलोकनासाठी एक पायाभूत सोपी चाचणी परीक्षा दि.20 सप्टेंबर रोजी घेतली. यामध्ये मराठी, इंग्रजी व गणित विषयातील मूलभूत क्रिया श्रवण,वाचन,लेखन ,आकलन आणि गणित विषयासाठी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यावर आधारित पंदरा गुण्यांच्या चाचणीचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. ही चाचणी प्रशालेच्या भव्य मैदानात इयत्ता सहावी ते नववी या वर्गांची घेण्यात आली.
या चाचणीस शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास देशमुख स्वतः अवलोकन व निरीक्षणासाठी मैदानात चाचणी पूर्ण होईपर्यंत उपस्थित होते. त्यांच्या सोबत विद्यार्थीहितदक्ष पालक राजेश हंबर्डे, शिक्षणप्रेमी नागरिक माधवराव हंबर्डे, गोविंदराव शंकरराव हंबर्डे, शाळेसाठी नेहमीच सकारात्मक भूमिका घेणारे संतोष हंबर्डे, उग्रसेन हंबर्डे यांची उपस्थिती लाभली होती. अत्यंत उपयुक्त अशी ही प्रश्नपत्रिका प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक शिवाजी वेदपाठक यांनी कृष्णा बिरादार यांच्या सहाय्याने काढली होती. प्रश्नपत्रिकेसंबंधी विद्यार्थ्यांना उपयुक्त सूचना राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेश कुलकर्णी यांनी दिल्या.या परीक्षेच्या माध्यमातून आलेल्या निकालाद्वारे जे विद्यार्थी पायाभूत संकल्पनेत कच्चे आहेत.
त्यांना मुख्य शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ही परीक्षा यशस्वी करण्यासाठी आनंद वळगे,चंद्रकला इदलगावे, उदय हंबर्डे, पद्माकर देशमुख, जयश्री शिंदे, पंचफुला नाईनवाड,वैशाली कुलकर्णी, शैलजा बुरसे,कांचनमाला पटवे, एम.ए.खदिर व विकास दिग्रसकर यांनी मोलाचे सहकार्य केले. अशा उपयुक्त पायाभूत परीक्षेचे आयोजन केल्याबाबत पालक व सुजाण नागरिकांनी समितीचे तथा प्रशालेचे कौतुक व अभिनंदन केले आहे.