‘एक दिवस बळीराजासाठीʼ या उपक्रमातून शासन पाठिशी असल्याचा विश्वास निर्माण करावा – कृषिमंत्री अब्दुल सत्तार -NNL


औरंगाबाद|
शेतकरी बांधव  विविध अडचणींना सामोरे जात शेती करीत असतो. ‘एक दिवस बळीराजासाठीʼ या उपक्रमातून शेतकरी बांधवाच्या मनातील निराशा दूर व्हावी व शासन आपल्या पाठिशी असल्याचा विश्वास निर्माण करावा, असे प्रतिपादन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कृषि अधिकाऱ्यांच्या बैठकीत आज केले.

या बैठकीस औरंगाबाद विभागाचे कृषि सहसंचालक डॉ. दिनकर जाधव, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. देशमुख, कृषि विज्ञान केंद्राचे प्रकल्प संचालक डॉ. किशोर झाडे, राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पाचे डि.जी हिंगोले, तहसिलदार चव्हाण यांच्यासह कृषि सहायक उपस्थित होते. शेतकऱ्यांशी थेट बांधावर जाऊन  संवाद साधत असताना त्यांना येणाऱ्या अडी-अडचणी जाणून घ्याव्यात, विचारपूस करावी. या उपक्रमातून अधिकाऱ्यांनी  भेट दिलेल्या  अहवालातून शेतकरी बांधवांसाठी कृषि विभागाबरोबरच इतर विविध विभागाच्या योजना समन्वयातून राबविण्यासाठी काही सूचना देण्यात आल्या. एक दिवस बळीराजासाठी उपक्रमात जिल्हाधिकारी, विविध विद्यापीठ, कृषी संशोधन संस्था, कृषि महाविद्यालये यांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे मंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले.

शेतकरी महिलांच्या अभ्यास दौऱ्याला प्रारंभ

सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथील 151 शेतकरी महिला अभ्यास दौऱ्यावर आज रवाना झाल्या. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून दौऱ्याला प्रारंभ करण्यात आला. राळेगण सिद्धी , हिवरे बाजार , राहुरी कृषी  विद्यापिठ , बारामती , दापोली , कोकण कृषी विद्यापीठ , तुळजापूर , पंढरपूर , कोल्हापूर , जेजुरी या ठिकाणी जाऊन शेतकरी महिला प्रशिक्षण व प्रात्यक्षिक पाहणार आहेत.

उपविभागीय कृषी अधिकारी प्रबोध चव्हाण ,  जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, सतीश ताठे, कायगावच्या सरपंच नंदाबाई जैवळ , उपसरपंच विश्वास दाभाडे ,  मंडळ कृषी अधिकारी प्रमोद दापके, कृषी सहाय्यक सारिका पाटील, ग्रामसेवक प्रभाकर भादवे आदि ग्रामस्थांची उपस्थिती होती

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला शेतात काम करतात. त्यामुळे पुरुषांप्रमाणे शेतकरी महिलांना देखील आधुनिक शेतीचे मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. त्याकरिता शेतकरी महिलांना शेती व शेतीपूरक व्यवसायाचे मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण व प्रत्यक्ष प्रकल्प पाहणी करता यावी यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला असल्याचे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

नैसर्गिक शेती, शेती पूरक व्यवसाय,  कलम बांधणीचे नर्सरी प्रात्यक्षिक, कुकुट-शेळी पालन, एकात्मिक शेती प्रकल्प, गोड्या व निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यपालन व मत्स्य संवर्धन अशा विविध विषयाच्या अनुषंगाने या दौऱ्यात महिलांना अभ्यास करता येणार आहे. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाच्या अनुषंगाने हा अभ्यास दौरा महत्त्वाचा असून लवकरच हा प्रयोग राज्यभर राबविण्याचा निर्णय घेणार असल्याचे सत्तार म्हणाले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी