कवी विठ्ठल लोणे यांच्या 'भिवा म्हणे लोका' पुस्तकाचे प्रकाशन
नांदेड। डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्त्वज्ञान सहज , साध्या,सोप्या भाषेत जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याचं काम कवींनी केले आहे.
आपणास जे कळते ते लोकांपर्यंत पोहचविले पाहिजे. माणसाला काही ना काही तरी गुण असतो,विचार असतो तो चांगला गुण,विचार इतरांपर्यंत पोहोचवला पाहिजे. कवी विठ्ठल लोणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सुविचार अभंगाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा वेगळा प्रयत्न केला आहे,असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी, साहित्यिक डॉ गणेशराज सोनाळे यांनी केले.
विठ्ठल रामजी लोणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुविचारांवर आधारित २०० पानांचा अभंगवजा कवितासंग्रह लिहिला आहे. हा कवितासंग्रह पुण्याच्या स्वयंदीप प्रकाशाने प्रकाशित केला आहे. आज या काव्यसंग्रहाचे आज प्रकाशन झाले. याप्रसंगी डॉ. सोनाळे अध्यक्षपदावरून बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून यशदा पुणे येथील अधिकारी डॉ. बबन जोगदंड,प्रसिद्ध कवी, डॉ. आदिनाथ इंगोले,साहित्यिक डॉ. राम वाघमारे यांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना सोनाळे म्हणाले, अनेक संतांनी व्यवस्थेच्या विरुद्ध जाऊन आपली लेखणी चालवली. त्यामध्ये संत कबीर, महात्मा ज्योतिराव फुले, संत तुकाराम यांनी दोहे,अखंड आणि अभंग प्रकार लिहिला.हा प्रकार जनमानसात मोठ्या प्रमाणात रुजला आहे. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार अभंगरूपात लोणे यांनी मांडला आहे. ते प्रगल्भ कवी असून ते बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सोबत घेऊन जगत आहेत. असे ते शेवटी म्हणाले.
यावेळी बोलताना डॉ. जोगदंड यांनी काव्यप्रकार हा विचार अभिव्यक्त करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे माध्यम असून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कवितांच्या माध्यमातून अनेक कवींनी आपल्यापर्यंत पोहोचविल्यामुळे ते आपल्याला समजले आहेत. यामध्ये लोककवी वामनदादा कर्डक यांचे महत्त्वाचे योगदान असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी डॉ. राम वाघमारे यांनी संत तुकारामांची अभंगवाणी कशी श्रेष्ठ होती व त्याचा जनमानसावर कसा प्रभाव आहे हे विशद केले. तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वर संत नामदेव यांनी जी अभंगरचना केली ती आजही अजरामर आहे. या अभंगवजा नव्या काव्यप्रकारामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामान्य माणसापर्यंत अधिक सोप्या, साध्या शब्दात पोहोचतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
यावेळी डॉ. आदिनाथ इंगोले यांनी या काव्यांमधून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार,अधिक वेगाने होतो,कारण तो अशिक्षितांनाही भावतो, असे सांगितले. आंबेडकरी समाजाकडे परंपरेने गीत गायनांची परंपरा आहे ती आणखी अधिकाधिक समृद्ध होत आहे असेही ते म्हणाले. साहित्य माणसाला जीवन जगण्यास प्रेरणा देते असे त्यांनी सांगितले.
विठ्ठल लोणे यांनी या काव्यामागची भूमिका विशद केली. अभंग काव्यप्रकार कसा असतो याबद्दल सांगून मला बाबासाहेब सामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हा प्रकार उपयुक्त असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजिनिअर भीमराव हटकर यांनी केले. या कार्यक्रमाला डॉ. राजेंद्र गोणारकर डॉ.विलास ढवळे,डॉ. कैलाश धुळे,डॉ. प्रशांत गजभारे,डॉ.प्रताप विमलबाई केशवराव,डॉ. श्रीराम गव्हाणे, उत्तम खंदारे, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.