अंगणवाडीताईचा बटवा पुस्तीका मार्गदर्शक ठरेल - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
नांदेड| गरोदर माता, किशोर मुली व शून्य ते सहा वर्षे वयोगटातील मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी सकस व पोषक आहार महत्त्वाचा आहे. त्यासाठी वाडी-वस्ती, तांड्यावर जाऊन आहाराचे महत्व पटवून देण्यासाठी अंगणवाडी कार्यकर्तीचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.
राष्ट्रीय पोषण महा निमित्त बाल विकास विभाग जिल्हा परिषद नांदेड व एकात्मिक बाल विकास सेवा योजना नांदेड अंतर्गत आज सोमवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी नांदेड पंचायत समिती सभागृहात आहार प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महिला व बाल विकास विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, सहाय्यक गट विकास अधिकारी ए.एल. सरोदे, बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रणवकुमार चटलावार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मुंडे, विस्तार अधिकारी जीवन कांबळे, गोविंद मांजरमकर, दशरथ आडेराघो, मेडपलवार, सतीश लाकडे, कक्ष अधिकारी गणेश शिवरात्री, मिलिंद व्यवहारे आदींची यावेळी उपस्थित होती.
पुढे त्या म्हणाल्या, आज आहार प्रदर्शनातून विविध पोषक आणि पौष्टिक पदार्थ ठेवण्यात आले आहेत. अंगणवाडी कार्यकर्तींनी बनवलेल्या पदार्थांचे संकलन करून अंगणवाडीताईचा बटवा या नावाने रेसिपी पुस्तिका काढण्यात येणार आहे. हे पुस्तक ग्रामीण भागातील महिलांसाठी उपयुक्त ठरेल, असे मत वर्षा ठाकूर यांनी व्यक्त केले. आजच्या आधुनिक काळात आजी, आई व सासू यांच्याकडून खाद्यपदार्थांचा आलेला वारसा आपण विसरत चाललो आहोत. हा वारसा जोपासून तो पुढच्या पिढीसाठी द्यायाचा आहे. वाडी-वस्त्यांवर अंगणवाडीताई सुदृढ आरोग्यासाठी पोषण आहाराचे महत्त्व पटवून सांगत आहेत. त्यांनी तयार केलेल्या विविध पौष्टिक पदार्थांत आरोग्यदायी मूल्य आहेत. त्यामुळे त्याची पुस्तिका तयार करून ग्रामीण भागात ते पोहोचवले जाणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
आहार प्रात्यक्षिकात विविध पोषक व पौष्टिक पदार्थ ठेवण्यात आले होते. बनवण्यात आलेल्या पदार्थाचे आरोग्यातील महत्व व माहिती फलक लावण्यात आले होते. शेवग्याच्या फुलांची व पानांची भाजी, कर्टूले, विविध रानभाज्या, घरातील उपलब्ध पदार्थापासून बनवलेले विविध रेसीपी, मोड व कडधान्या पासून बनवलेले पदार्थ प्रदर्शनात मांडण्यात आले होते. नांदेड तालुक्यातील 8 अंगणवाडी बीट मधून 232 अंगणवाडी कार्यकतींनी यात सहभाग नोंदवला होता. बाल विकास प्रकल्प अधिकारी व अंगणवाडी पर्यवेक्षीकांनी यासाठी पुढाकार घेतला होता.