नांदेड| परिसर अभियांत्रिकी सहकारी गृहनिर्माण संस्था अंतर्गत विकास नगरीच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे प्रतिपादन संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. श्याम दवणे यांनी केले.
तरोडा बुद्रुक येथील परिसर अभियांत्रिकी सहकारी गृहनिर्माण संस्थेची आमसभा रविवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी पार पडली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर संस्थेचे सचिव परमेश्वर दिपके, कोषाध्यक्ष पांडुरंग तारू, उपाध्यक्ष गंगाधर सोनाळे, सल्लागार मनोहर भास्करे, संचालक सोपान गायकवाड, शंकर इरलोड, मीनाक्षी कावळे, पंचशीला हटकर, रोहिदास कांबळे, डोंगरे आदींची उपस्थिती होती.
सदर सभेत जुन्या पदाधिकाऱ्यांकडून संस्थेचे रेकॉर्ड हस्तांतरण करणे 2021-22 चा आर्थिक व्यवहार व ताळेबंद हस्तगत करून त्यास मंजुरी देणे, सन 2022-23 च्या अंदाजपत्रकाचे ठराव आणि मंजुरी, संस्थेचे सभासद करून घेणे, मयत सभासदांचे वारसदारांच्या नावे प्लॉट करून देणे, विकास निधी भरणे आदी विषय घेण्यात आले.
विकास नगर मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, नळ पाईपलाईन करणे, नगराचे सुशोभीकरण करणे, संस्थेचे कार्यालय, वाचनालय, रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड, नगरात वॉचमन ठेवणे, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे, स्वच्छतेसाठी उपक्रम हाती घेणे आदी विषयावर चर्चा करून सर्वांनुमते ठराव घेण्यात आला. यावेळी परिसर अभियांत्रिकी सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सभासद यांची उपस्थिती होती. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आमसभेची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोहर भास्करे तर मुद्देनिहाय ठरावाचे वाचन सचिव परमेश्वर दिपके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शामराव हाटकर यांनी केले.