औराळ्याच्या सरपंच व कंत्राटी ग्रामसेवकाचा प्रताप -NNL

स्वच्छ व हागणदारीमुक्त गांव असतांनाही आजी-माजी सरपंच व उपसरपंच अन् माजी पोलीस पाटील यांच्यासह अनेकांना शौचालय अनुदानाची खैरात !


नायगांव बा./नांदेड।
स्वच्छ व हागणदारीमुक्त गांव म्हणून घोषित असतांनाही आजी-माजी सरपंच व उपसरपंच तसेच,माजी पोलीस पाटील व अनेकांना बनावट कागदपत्रांतून लाभार्थी बनवून शौचालय बांधकाम व वापर अनुदानासाठी मंजूरी देत त्यांना शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेची जणू खैरात वाटल्याचा नवा प्रताप औराळा येथील सरपंच सौ.वर्षा सतिश वाघमारे व कंत्राटी ग्रामसेवक आर.जी.मुदखेडे यांनी संगणमतातून घडविल्याची गंभीर बाब माहिती अधिकारातून उघड झाल्यानंतर कुंभकर्णी झोपेच्या सोंगाधीन असलेले प्रशासन खडबडून जागे असून या प्रकरणात अनेकांवर  कारवाईचे संकेत प्राप्त झाल्याने तालुक्यात खळबळ निर्माण झाली आहे.

सविस्तर वृत्त असे की,आम्ही गांव स्वच्छ ठेवण्यासाठी कटिबद्ध आहोत अशी जणू शपथच घेऊन दि.१७ नोव्हेंबर २०१७ रोजी औराळा गांव स्वच्छ व हागणदारीमुक्त गांव म्हणून घोषित करण्यात आले व तसे,या गांवात ग्रामपंचायतीने त्या काळी फलकही लावला मात्र शासनस्तरावरून आलेल्या विविध विकास योजना व वैयक्तिक लाभांच्या योजना बनावट कागदपत्रांतून मिळवून देतांनाच आपले आर्थिक हित साधण्यात माहिर असलेल्या कांही कर्मचारी व अधिकारीवर्गाला हाताशी धरुन येथील सरपंच सौ.वर्षा सतिश वाघमारे व कंत्राटी ग्रामसेवक आर.जी.मुदखेडे यांनी संगणमतातून योजनानिहाय विकास कामे व वैयक्तिक लाभांच्या योजना कागदोपत्री 'ओके' बनवून वाटचाल करित आहेत.नायगांव पंचायत समितीमधील पंचायत विभागाच्या 'एका' विस्तार अधिकाऱ्यांकडून सातत्याने पाठबळ असल्याने अनेकदा पुराव्यानिशी तक्रारीनंतरही सदर ग्रामपंचायत कार्यक्षेञातील चौकशांचा केवळ फार्सच होतोय.

 मात्र चौकशीनंतरही अहवाल गुलदस्त्यातच असल्याने संबधित दोषींविरुद्ध कारवाई अद्याप झालेली नाही.त्यामुळेच मनोबल वाढलेल्या सरपंच व कंत्राटी ग्रामसेवकांने अनेक विकास कामे व त्यासाठीच्या निधीची चांगलीच विल्हेवाट लावली असली तरिही वैयक्तिक लाभांच्या योजनाही त्यांनी लग्न न झालेल्या व्यक्तींना तसेच, एकाच कुटूंबियास अनेकदा व विशेषतः एकाच मालमत्ता, जागेत दिल्या आहेत.सदर लाभार्थीपर्यंत योजना पोहचवितांनाच सरपंचांनी आपल्या कुटुंबात सासू व पतीच्या नांवे घरकुलाचा लाभ घेतला असला तरिही व पतीने शौचालय बांधकाम व वापर अनुदान यापूर्वीच घेतल्यानंतरही दुसर्‍यांदा लाभ घेतला असून त्याचबरोबर,उपसरपंच, 

माजी सरपंच व माजी पोलीस पाटील यांच्याही कुटूंबियास लाभ दिला असल्याची गंभीर व नियमबाह्य बाब माहिती अधिकारातून उघड झाली असून बनावट कागदपत्रांतून सदरच्या योजनांचा लाभ संबधित लाभार्थीना मंजूर करण्यात आला असल्याचेच यावरुन स्पष्ट होते.त्यामुळे सदर प्रकरणात पंचायत समिती व ग्रामपंचायत कार्यालयाकडून माहितीचा अधिकार अधिनियम २००५ नुसार माहिती घेऊनच दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई होण्यासाठी आपण पाठपुरावा करित असून याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी दि.२६ सप्टेंबर पासून आमरण उपोषणास बसणार असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते व ग्रामपंचायतीचे माजी सदस्य किरण वाघमारे यांनी सांगितले.

दरम्यान औराळा येथील विविध विकास योजना तसेच,शौचालय बांधकाम व वापर अनुदान मंजूरी व वाटपातील गैरव्यवहार पुराव्यानिशी सिद्ध झाल्यानंतर कायदेशीर कारवाईपासून सुटका व्हावी यासाठी नायगांव पंचायत समितीमधील 'कांही' अधिकारी व कर्मचारीवर्गाची आजपर्यंत लागलेली 'फिल्डींग' त्यांच्यावरच पलटण्याची शक्यता असून वरिष्ठांच्या झाडाझडतीनंतर कुंभकर्णी झोपेच्या सोंगाधीन असलेले संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लवकरच चौकशीसह दोषी व त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कायदेशीर संकेत दिले आहेत.याबाबतची कानगूण लागल्याने कांहीजण मात्र 'मी नाही त्यातली..' म्हणून स्वतःची सुटका करुन घेत सदर प्रकरणात औराळ्याचे सरपंच व कंत्राटी ग्रामसेवकांवरच कारवाईसाठी प्रयत्नरत असल्याचे समजते.

...अनेक गांवात चर्चा रंगली !

विशेष म्हणजे शासनाच्या कोणत्याही विकास योजना असो वा वैयक्तिक लाभांच्या योजना.यामध्ये पंचायत समितीमधील संबधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी स्वहित साधतात हे नायगांवमध्ये अनेकदा स्पष्ट झालेले आहे. परंतू,या प्रकरणात मात्र कारवाईच्या कचाट्यातून स्वतःची सुटका करुन घेत औराळ्याच्या सरपंच व कंत्राटी ग्रामसेवकावरच जबाबदारी निश्चित करुन त्यांच्यावरच कायदेशीर कारवाईचे प्रयत्न होत असल्याने अनेक गांवातील गांवपातळीवरचे लोकप्रतिनिधी व कर्मचारी यांना चांगलीच 'गोची' झाली असून याबाबतची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे असल्याचा 'धसका' अनेकांनी घेतल्याची रंगतदार चर्चा नायगांव तालुक्यातील अनेक गांवात ऐकावयास मिळाली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी