लोहा| जिल्हा परिषद शाळा ही शाश्वत ग्राम विकासाची एकमेव आकांक्षा असल्याचे प्रतिपादन राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे यांनी केले आहे. गावात रस्ते, नाल्या, लाईट यापेक्षा गावातील शाळा आणि शिक्षणाच्या गुणवत्तेकडे आपुलकी आणि बारकाईने लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी गावकऱ्यांना केले.
लोहा तालुक्यातील निळा या गावचे आदर्श मुख्याध्यापक मन्मथ किडे यांच्या सेवापुर्ती निरोप समारंभात माजी शिक्षण संचालक बोलत होते. मुख्याध्यापक मन्मथ किडे यांनी निळा गावात जी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची शैक्षणिक क्रांती केली आहे त्या कार्याला मी विनम्र नमन करतो या शब्दात राज्याच्या पूर्व शिक्षण संचालकांनी किडे यांचा सन्मान केला..माजी जिल्हा परिषद सदस्य रंगनाथराव भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
मन्मथ किडे गेली दहा वर्षे या गावात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी निळा येथील शाळेचा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे. शाळेतील प्रत्येक विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षण शिकून जीवनाच्या रणांगणात सक्षमपणे उतरल्याचे चित्र दिसत होते. दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. मुख्याध्यापक मन्मथ किडे यांची गावकऱ्यांनी साऱ्या गावातून सजवलेल्या बैलगाडीतून सवाद्य मिरवणूक काढली... शेतकरी शेतमजूरांसह सारी कामे बंद ठेऊन सारा गाव कार्यक्रमस्थळी शाळेच्या मैदानात उपस्थित होता..प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार जेष्ठ काँग्रेस नेते ईश्वरराव भोसीकर माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे, वंचित आघाडीचे शिवा नरांगले , माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव कपाले, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षिका प्रेमला नरांगले उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख आढाव यांनी केले ..
प्रारंभी देशाच्या प्रथम शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून ज्ञानाचा दीप प्रज्वलित करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या ओजस्वी भाषेत मुख्याध्यापक मन्मथराव किडे यांच्या प्रेमळ स्वभाव आणि रात्रंदिवस शाळेत काम करण्याच्या स्वभावाचे वर्णन केले. चिमुकल्यांच्या भाषणाने अवघा गाव सदगदित झाला होता.. मुलांच्या भावनिक भाषणाने उपस्थितांच्या नेत्रात अश्रू उभे राहिलेले दिसत होते. मुख्याध्यापक मन्मथ किडे यांनी केलेल्या शैक्षणिक विकासातून या गावात एक नवा इतिहास घडल्याचे जेष्ठ नेते माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांनी आपल्या भाषणात प्रतिपादन केले.
माजी आमदार शंकरराव धोंडगे यांनी आपल्या भाषणात मुख्याध्यापक मन्मथ किडे यांनी निळा गावात शिक्षणासाठी केलेले कार्य या गावाच्या पिढ्यानपिढ्या लक्षात ठेवतील असे सांगून जिल्हा परिषदेच्या इतर मुख्याध्यापकांना मन्मथ किडे यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेऊन कार्य करण्याचे आवाहन केले. सत्काराला उत्तर देताना मुख्याध्यापक मन्मथराव किडे यांनी विद्यार्थी घडविण्यासाठी गावकरी आणि शाळेतील इतर शिक्षकांनी दिलेल्या हार्दिक सहकार्याचे आभार प्रकट केले. आपण जरी सरकारी नियमानुसार सेवा निवृत्त झालो असलो तरी गावकरी, विद्यार्थी आणि शाळेपासून कधीच दुरावणार असा भावपूर्ण संदेश दिला... कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन आणि आभार परशुराम कौसल्ये यांनी मानले...