हिमायतनगर। राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना ही महात्मा गांधी यांच्या विचार जाणीवेतून झाली. त्यांनी खेड्याकडे चला असा संदेश दिला. या संदेशाला सत्यात उतरविण्यासाठी खेड्यातील लोकांच्या जाणिवा, प्रश्न व त्यांचे जीवन जाणून घेण्यासाठी तसेच त्यांच्याशी असलेली बांधिलकी जपण्यासाठी आणि माझी शाळा, माझे राष्ट्र, माझेगाव, माझा शेजारी इतरांच्यासाठी काहीतरी करण्याची उमेद निर्माण व्हावी तसेच तरुणांना संस्कारक्षम बनवण्यासाठी एक व्यासपीठ असावं ज्यांच्या माध्यमातून युवकातील तेजस्विता तत्परता व तपस्विता याविषयीचे जाणीव त्यांना करून देण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना करण्यात आली. असे सविस्तर मत त्यांनी मांडले.
अशा 50 मिनिटे चाललेल्या मनोगतातून त्यांनी मिस्कीलिने व विनोदाने तसेच अनेक उदाहरणे देऊन युवकांना राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व पटवून दिले. ते पुढील मनोगतात म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आई-वडिलांच्या केलेल्या श्रमाची जाणीव ठेवावी. याविषयी त्यांनी एका आई-वडिलांनी केलेल्या श्रमाची जाणीव या कथेतून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच ते पुढे युवकांच्या व्यक्तिमत्त्वाची व्याख्या करताना म्हणाले की, अंतर्बाह्य गुणाची गोळा बेरीज म्हणजे व्यक्तिमत्व होय. स्वतःची स्वतःला जाणीव करून घेवून इतरांविषयी च्या जाणीवा निर्माण करून घेण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे व्यासपीठ आहे. असे सविस्तर मत हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना व तहसील कार्यालय हिमायतनगर यांच्या वतीने 24 सप्टेंबर एनएसएस स्थापना दिवस व निवडणूक ओळखपत्राची आधार लिंक कार्यशाळा अशा दुहेरी कार्यक्रमाच्या मंचावरून प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. डि. के. कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते मॅडम ह्या लाभल्या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. डी. के. कदम समाजशास्त्र विभागाचे प्रमुख, तसेच तहसील कार्यालयाचे आवर कारखून चंदू राठोड तसेच कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी भदरगे आदी लाभले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व वीर हुतात्मा जयवंतराव पाटील वायपणेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व मान्यवरांच्या स्वागत समारंभा नंतर मतदार ओळखपत्राशी आधारलिंक या उपक्रमाच्या प्रचार प्रसारासाठी छापण्यात आलेल्या पत्रकाचे अनावरण मंचावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सदरिल कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे संयोजक रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी भदरगे यांनी केले. तद्नंतर मंचावर उपस्थित असलेले तहसील कार्यालयाचे तहसीलदार प्रतिनिधी श्री चंदू राठोड यांनी ओळखपत्राची आधार लिंक कशी करावी या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. शेवटी अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते मॅडम यांनी मतदार यादीमध्ये मतदाराचे नाव नोंदणी करणे किती महत्त्वाचे आहे. याविषयी सविस्तर मत मांडले.
या कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा विद्यार्थी निलेश चटणी यांनी केले. तर आभार राष्ट्रीय सेवा योजना सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. एल. बी. डोंगरे यांनी मानले. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.