मुखेड, रणजित जामखेडकर। मुखेड शहरात उपविभागीय मृद व जससंधारण उपविभागाचे कार्यालय मुखेड - नरसी रोडवर मोहनावती धाब्याच्या समोर आहे. या कार्यालयात वारंवार अधिकारी कर्मचारी गैरहजर राहात असल्याची चर्चा नेहमी ऐकण्यास मिळते पण आज दि.८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत या कार्यालयात एकही कर्मचारी उपस्थित नसल्याने तहसिलदार काशिनाथ पाटील यांच्या आदेशाने या कार्यालयाचा पंचनामा करण्यात आला.
दि.०८ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी दैनिक श्रमिक लोकराज्यचे संपादक ज्ञानेश्वर डोईजड व संदिप पिल्लेवाड हे उपविभागीय अधिकारी जलसंधारण, मृद व जससंधारण उपविभाग कार्यालय मुखेड येथे सकाळी ११ वाजता गेले असता कार्यालयास चक्क कुलूप लागल्याचे दिसून आले ही बाब कर्तव्यदक्ष तहसिलदार काशिनाथ पाटील यांच्या निर्दर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ तलाठी जी.डी. कल्याणकर यांना पाठवून दिले.या दरम्यान कल्याणकर यांनी सदर कार्यालयास भेट देवून पहाणी केली असता त्याठिकाणी कार्यालयात अकराच्या नंतर केवळ एक कर्मचारी उपस्थित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले तर चार कर्मचारी गैरहजर होते त्यापैकी एक कर्मचारी प्रशिक्षणासाठी गेल्याची माहिती मिळाली तर उर्वरीत तीन कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसून आल्याने त्यांनी संबंधित कार्यालयाचा पंचनामा केला.
महत्त्वाचे म्हणजे या कार्यालयाकडे कोणीच लक्ष देत नाही व नागरीकांची सुध्दा तिकडे रेलचेल कमी प्रमाणात असते. कार्यालयच अशा ठिकाणी आहे की शोधायलाच दिवसभर लागेल अशी परिस्थिती. कार्यालयात आल्यावरच कोणते कार्यालय आहे हे एकाच बोर्डने कळते याचाच फायदा येथील अनेक अधिकारी कर्मचारी गैरहजर राहुन घेत असतात तर कोणालाही या बाबत सांगितले तर काहीच होणार नाही असा समज सुध्दा या कार्यालयासह तालुक्यातील ब-याच प्रशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा झाला असल्याची चर्चा नागरीकांतून होताना दिसत आहे तरी या महत्वपूर्ण विषयाकडे संबधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे मत तालुक्यातील सुज्ञ नागरिकांतुन व्यक्त होत आहे.
मागील काही दिवसांपासून या कार्यालया कडुन साहेब कुठे गेले मिटींगला गेले, कर्मचारी कुठे गेले नांदेडला टपाल दयायला गेले. साहेब कुठे गेले साईड वर गेले अशी उत्तरे ठरलेली असतात. यामुळे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन जनतेची गैरसोय टाळावी अशी मागणी होताना दिसत आहे.