नांदेड| शहरातील एका व्यावसायिकास कुख्यात गुंड हरविंदसिंग रिंदा याच्या नावाने ८० हजार रुपयाची खंडणी मागणाऱ्या एकास एसआयटी पथकाने ताब्यात घेतले आहे. नांदेड शहरातील प्रतिष्ठित नागरिकांना रिंदाच्या नावाने फोन करून धमकी देत खंडणी मागण्याचे प्रकार सुरू आहेत. असे पुन्हा घडलेल्या या प्रकारावरून पुढे आले आहे.
नुकतीच एक घटना नांदेड शहरातील भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत २ ऑगस्ट रोजी घडली. यातील एका आरोपीने त्याच्या मोबाइलवरून एका व्यावसायिकास फोन करून तुमचा नंबर मला रिंदा याने दिला आहे. असे म्हणून फोन पेवर ३०, हजार रुपये व नंतर ५० हजार रुपये टाका म्हणून रिंदाची भीती दाखवली व खंडणीची मागणी केली.
या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यातील आरोपीचा एसआयटी पथकाने शोध घेऊन आरोपी देविदास गणेश गायकवाड, (४५, व्यवसाय बेकार, रा. वरवट, ता. कंधार जि. नांदेड) यास ताब्यात घेतले. पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, नीलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एसआयटी पथकाने ही कारवाई केली.