नांदेड/नाशिक| मी काँग्रेस पक्ष सोडण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. मला माहित नाही कि.. अशी चर्चा कोण करत आहे. पण तो पार्टीचा हितचिंतक असू शकत नाही असेही अशोक चव्हाण यांनी या निराधार चर्चेला विराम दिल आहे.
अनेक राजकीय नेते भाजप व शिवसेनेच्या बंडखोर गटात प्रवेश करत आहेत. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व त्यांचे काही समर्थक आमदार भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. दरम्यान, भाजपचे खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अशोक चव्हाण हे लवकरच भाजपत प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यामुळे चर्चेला उधाण आलेे होते.
शिंदे - फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करताना अशोक चव्हाणसह अनेक आमदार अनुपस्थित होते. त्यामुळे विरोधी पक्षाची ताकत कमी झाली होती. त्यावेळी विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मागे असलेल्या अदृश्य हातांचेही धन्यवाद मानले होते. बहुमत चाचणी सिद्ध करण्याच्या महत्वपूर्ण वेळी अशोक चव्हाण हे उशिरा पोहोचले त्यामुळे काँग्रेस गोटात खळबळ माजली होती. या प्रकाराला गंभीरतेने घेऊन काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठानी अशोक चव्हाण यांच्यासह आमदारांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आल्याचे चर्चेने राजकारण ढवळून निघाले होते.
तेंव्हापासून काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण हे नाराज असल्याचे चर्चा सुरु झाली. त्यामुळे काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असून, भाजपमध्ये जाणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. याबाबत सोमवारी नांदेडच्या नवा मोंढा चौकात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर चव्हाण यांनी आपण काँग्रेसमध्येच राहणार असून, पक्ष सोडण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही असे सांगितले.