सर्वांनी आपल्या घरावर तिरंगा फडकविण्याचे भिक्खू संघाचे आवाहन; श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात जनजागृती कार्यक्रम
नांदेड| जिल्हा प्रशासनाने आवाहन केल्याप्रमाणे येत्या १३ ते १५ आॅगस्ट या कालावधीत 'हर घर तिरंगा' या अभियानास लोकचळवळीचे रुप देण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे असे आवाहन येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी केले. यावेळी भिक्खू चंद्रमणी, भिक्खू धम्मकिर्ती भिक्खू श्रद्धानंद यांच्यासह श्रामणेर भिक्खू संघ, माजी उपप्राचार्य साहेबराव इंगोले प्रा. एस. एच. हिंगोले, प्रा. विनायक लोणे, साहित्यिक प्रज्ञाधर ढवळे, आप्पाराव नरवाडे, सिद्धांत इंगोले यांची उपस्थिती होती.
तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात संचालक भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या अध्यक्षतेखाली 'हर घर तिरंगा' या अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पुढे बोलताना पंयाबोधी म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभरात 'हर घर तिरंगा'या अभियानाने लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त केले आहे. सर्व जाती, धर्म, पंथ, संप्रदायातील सर्व समाजघटकांनी कोणतीही अनास्था न बाळगता मोठ्या उत्साहाने या अभियानात सहभागी झाले पाहिजे. यानिमित्ताने श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात ५५ फुट उंचीचा राष्ट्रध्वज १३ आॅगस्ट रोजी फडकविण्यात येणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.