दीड महिन्यात 137 आत्महत्या
औरंगाबाद/हिमायतनगर (नांदेड)| तीन लेकरं आणि वयस्कर सासरे यांची एकाएकी जबाबदारी पडलेल्या रेणुका गोटमवाड यांचे डोळेही काळजीनं काळवंडले होते. अडीच एकरातल्या सोयाबीनसाठी आणलेल्या कीटकनाशकानंच त्यांचे पती राजू गोटमवाड यांनी स्वत:चा शेवट केला. "त्यांना जी चिंता सतावत होती, ती आता मला सतावतेय', शून्यात बघत छत्तीस वर्षांच्या रेणुकाताई सांगत होत्या. या वेळी सोयाबीन झालं की सावकाराकडून ४ टक्के महिन्यानं घेतलेलं कर्ज फेडण्याचा त्यांचा विचार होता. पण फाटलेल्या आभाळानं उभ्या पिकाचा चिखल केला आणि राजू यांचाही धीर सुटला.
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुका गेल्या दीड महिन्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या येथे झाल्या आहेत. साधारणपणे अडीच ते तीन एकर जमीनधारणा क्षेत्र असलेला हा तालुका आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून यंदा राज्यात सर्वाधिक आत्महत्या येथील आहेत. पाच एकरांच्या शेताचं तळं झालेलं प्रथमेश दाखवत होता. पंधरा दिवस उलटले तरी शेतातलं पाणी सुकलं नव्हतं. याच पाण्यानं धास्तावलेल्या सुरेश मानेंनी पिकासाठी आणलेलं औषध पिऊन आपली जीवनयात्रा संपवली. पंधरा वर्षांचे जुळे प्रथमेश आणि प्रतीक आणि दहा वर्षांचा प्रणव या तीन लेकरांना माघारी सोडून. त्यांच्यावर एसबीआयचं दीड लाखाचं, सोसायटीचं पावणेदोन लाखांचं आणि बचत गटाचं २ लाखांचं कर्ज असल्याचं त्यांचे बंधू सुभाष माने सांगत होते. त्यांच्या घराशेजारीच एक आलिशान महाल वाकुल्या दाखवत होता.
हिमायतनगरचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या या आलिशान महालाजवळच ८ ऑगस्टला सुरेश मानेंनी आत्महत्या केली. ‘आमचे एकत्र कुटुंब आहे. घराचा सर्व कारभार सुरेशरावांकडेच होता. आम्हा दोघांमध्ये १० एकर जमीन आहे. घरची सर्वच मंडळी शेतात राबणारी. मागील वर्षी सर्व पिके वाहून गेली होती. त्यामुळे सोसायटीचे १.६० लाख, स्टेट बँक ऑफ इंडियाकडून पावणेदोन लाख आणि खासगी बचत गटाकडून २ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्ज भरण्यासाठी सोयायटीच्या नोटिसा येत होत्या. बचत गटातील पैसे घेऊन आधीच्या काही सावकारांचे देणे दिले होते. जुलैचा पूर्ण महिना आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात रोज तुफान पाऊस झाला. याच पावसात सोयाबीन पिवळे पडले आणि पाने गळू लागली. उत्पन्नाचा अन्य काही मार्ग नाही. पीक हातचे गेले होते. सुरेशराव संध्याकाळी शेतात आखाड्यावर झोपायला गेले ते परत आलेच नाहीत,' त्यांचे बंधू सुभाष माने सांगत होते. या कुटुंबाची १० एकर जमीन आहे. कर्ज फेडण्यासाठी त्यांना ती विकायची आहे. पण खरेदीसाठी गावात कुणाजवळच पैसे नसल्याचे ते सांगत होते. "आमच्यासारखीच परिस्थिती अख्ख्या गावाची झालीय. शासनाने आता हेक्टरी १३५०० रुपये मदत जाहीर केली आहे. पण, प्रत्यक्षात एका हेक्टरसाठी २५ हजारांचा खर्च झालाय, उधारी, उसनवारी करून जे पैसे गुंतवले ते पण फेडता येणार नाहीत,’ ते हिशोब मांडत होते.
याच तालुक्यातील पारवा गावच्या रेणुका गोटमवाड यांची परिस्थिती तर याहून बिकट. दोन मुली, एक मुलगा आणि वृद्ध सासरे मागे सोडून त्यांचे पती राजू गोटमवाड यांनी १४ जुलैला आत्महत्या केली. रेणुका सांगत होत्या, ‘घरची अडीच एकर शेती. मागील वर्षी परतीच्या पावसात हातातोंडाशी आलेले सोयाबीन वाहून गेले. खासगी सावकाराकडून ४ टक्के महिन्यानं दोन लाख रुपये घेतले. यंदाच्या पिकावर हे २ लाख फिटतील, ही आशा होती. मात्र, महिनाभर झालेल्या अतिपावसामुळे पीक पूर्णपणे वाया गेले. सोयाबीनला टाकण्यासाठी खत आणले होते, कीटकनाशक आणले होते. पण, एकसारख्या पावसामुळे शेतात पाय ठेवणं अवघड होतं. खत, कीटकनाशक तसेच घरात पडून राहिले.
एक दिवस पावसाने उघडीप दिली आणि पती सकाळीच उठून शेतात पाहणी करायला गेले. सोयाबीनच्या नुसत्या काड्या झालेल्या, त्यापेक्षा उंच दिसणारे तणकट. शेतातून घरी आले आणि बाजूच्या खोलीत जाऊन सोयाबीनला फवारणीसाठी आणलेलं अर्धा लिटर कीटकनाशक पिऊन पडले... ज्या चिंतेनं माझा पती गिळला, तीच चिंता मलाही भेडसावतेय. सावकाराचे कर्ज कसे फेडू, लेकीचं लग्न कसं करू, घरखर्चासाठी पैसे कुठून आणू?’ त्यांच्या प्रश्नांचं उत्तर आज तरी कुणाजवळ नाही. म्हातारे वडील कळवळून सांगत होते, ‘जून महिना पावसाविना गेला. पाऊस पडेल, या आशेवर दीड एकरात सोयाबीन आणि एक एकर कापूस लावला होता. पण, जूनमध्ये पाऊस पडला नाही. जुलैमध्ये दुबार पेरणी केली. पिकं उगवून आली. पण, एकदा सुरू झालेला पाऊस अखंड महिनाभर रोजच पडत होता. शेतात पाऊल टाकता येत नव्हतं. पिकांना खुरपणी करून खतं देण्याची वेळ आलेली. कपाशीवर कीटकनाशक फवारणी गरजेची होती.
ऊन पडण्याची वाट पाहत राजूने फवारणी थांबवली होती. खुरपणी आणि खत घालण्यासाठीही शेतात वाफसा लागतो. पण, एकसारखा कोसळणारा पाऊस शेतात जाऊ देत नव्हता. १४ जुलै रोजी सकाळीच सहा उठून चहा घेऊन राजू शेतात चक्कर मारायला गेला. अर्धा तासाने घरी आला. बाजूच्या खोलीत गेला. फवारणीसाठी आणलेलं अर्धा लिटर कीटकनाशक प्यायला... बाजूलाच मागच्या खोलीच्या उंबऱ्याजवळ गलितगात्र होऊन बसलेली रेणुका आणि शून्यात बघणाऱ्या लेकी. डोळ्यातली आसवंही आटली होती. रेणुकाताई सांगत होत्या, माझा हात मोडला. हातात रॉड आहेत. उपचारासाठी पैसे नव्हते. मागील वर्षही उत्पन्नाविनाच गेलेलं. म्हणून माझ्या पतीने खासगी सावकाराकडून ३ टक्क्यांनी २ लाख रुपये कर्ज घेतलं. सोबत स्टेट बँक ऑफ इंडियाकडूनही ५५ हजारांचं पीक कर्ज घेतलेलं होतं. या पैशांतून मोठ्या मुलीचं लग्न आणि माझ्या हाताचा उपचार करून यंदाच्या पिकावर कर्ज फेडायचं नियोजन होतं. मात्र, पिकांनी असा दगा दिला. पुढील वर्षभर घरखर्चाला पैसे नसणार, तिथे कर्ज कुठून फेडायचे, या विवंचनेत ते नेहमीच दिसायचे. पण, ही विवंचना त्यांना आत्महत्येपर्यंत घेऊन जाईल, असं कधी वाटलं नव्हतं. त्यांनी लवकर हार मानली. त्यांनी ज्या चिंतेनं आत्महत्या केली, तीच चिंता आता मलाही भेडसावते. कर्ज कसं फेडू, मुलींचं लग्नं कसं करू?’ हीच चिंता रेणुकाताईंना सतावत आहे. हिमायतनगर तालुक्यामध्ये आत्महत्या केलेल्या प्रत्येक कुटुंबात हेच चित्र पाहायला मिळालं. चाळीस टक्क्यांपर्यंतच्या सावकारी कर्जाचा फास आणि अतिवृष्टीमध्ये वाहून गेलेल्या सर्व पिकांमुळे शेतकरी टाेकाचे पाऊल उचलत आहेत.
आत्महत्या केलेल्या मानेंची दोन मुलं; त्यांच्या डोळ्यातलं पाणी सुकलंय पण शेतातलं नाही भोकर आणि हिमायतनगरच्या मधोमध वाईवाडी तांडा. गावाला चोहोबाजूंनी डोंगरांचा वेढा. कुठूनही पाणी खळाळताना दिसायचे. डोंगरांमध्ये मुरलेले पाणी शेतात पाझरून पुढे तलावाच्या दिशेने मार्गस्थ होत होते. याच गावातील हरी रामधन आडे (५०) यांनी १ ऑगस्ट रोजी तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. गावात गेलो तेव्हा त्यांचं बारावं होतं. खुर्चीवर हरिभाऊंंचा फोटो आणि यंदा राखी बांधायला नाही का येणार म्हणत रडणारी बहीण. त्यांचे भाऊही तीच कहाणी सांगत होते, ‘यंदा पावसाने कहर केला. एक तर गावाला चोहोबाजूंनी डोंगर आहे. डोंगरात मुरलेले पाणी शेतात पाझरत आहे. आता पाऊस बंद होऊन तीन-चार दिवस झाले, तरीही शेतातील पाणी हटत नाही.
हरिभाऊने स्टेट बँक ऑफ इंडियाकडून १ लाख ९० हजार रुपयांचे कर्ज घेतलेले होते. गावातल्या खासगी सावकाराचेही काही पैसे होते. आत्महत्या करण्याच्या आठ दिवस आधीपासूनच हरिभाऊ अस्वस्थ दिसायचा. घराजवळ मंदिर आहे. रात्री-अपरात्री उठून तो मंदिरात झोपायला जायचा. असाच ३१ ऑगस्टला रात्री एक वाजता उठला आणि मंदिरात झोपायला चाललो सांगून बाहेर पडला.' दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह शेताजवळच्या तलावात तरंगताना दिसला. ज्या शेताने दगा दिला, त्याच शेतात हरिभाऊंची समाधी बांधली आहे. ही समाधी बांधण्यासाठी दोन फुटांचा खड्डा खोदला होता, त्या खड्ड्यातही जणू विहिरीला लागावं तसं पाणी लागलं होतं. याच पाण्यानं हिमायतनगरमधल्या या साऱ्या घरांच्या भविष्यावर पाणी फिरवलंय.