ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून सरसकट मदत देऊन शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढणे अपेक्षित
नांदेड| महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर असलेल्या नांदेड जिल्ह्यातल्या हिमायतनगर तालुक्यात २२ दिवसात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यात शहरापासून १२ किमी अंतरावर असलेल्या लाइन तांडा, दुसरी वायवाडी तांडा आणि १५ किमी अंतरावर असलेल्या पारवा बु. येथील शेतकऱ्याने अतिवृष्टी आणि सततच्या नापिकीला कंटाळवून आत्महत्या केल्या आहेत.
या तालुक्यातील बहुतांश कुटुंबांच्या उपजीविकेचे साधन शेती असून, याचा शेतीला यंदाच्या अतिवृष्टीने घरघर लागली असुन्याचे तालुक्यात कहर केलेल्या महापुराच्या पावसाने दाखवून दिले आहे. दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर शेतकऱ्यांनी यंदा कर्ज काढून पेरणी केली. पण पावसाने झोडपल्याने पिके पाण्याखाली गेली अन् कर्ज कसे फेडावे या चिंतेत शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग अवल्माबविला आहे. लाईन तांडा येथील तरुण शेतकरी अंकुश कैलास राठोड (२८) यांनी नैराश्यात विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले. अंकुश प्रमाणेच गेल्या २२ दिवसांत तालुक्यातील तिघांनी, तर फक्त दोन महिन्यांत जिल्ह्यात २१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
जिल्ह्यातील जंगल क्षेत्र व आदिवासी बहुल असून, हिमायतनगर तालुका याचा क्षेत्रात आहे. शेती हेच येथील नागरिकांच्या उपजीविकेचे साधन आहे. ज्यांच्याकडे शेती नाही ते मजुरी करतात. विदर्भातील लोकांना मराठवाडा व तेलंगणात जाण्यासाठी हिमायतनगर हा सोयीचा मार्ग आहे. पण येथे तीन वर्षांपासून सतत अतिवृष्टी, निसर्गाच्या अवकृपेमुळे नापिकी होत आहे. पण यंदा अतिवृष्टीमुळे सोयाबीन व कापूस असलेली शेती खरडून गेली. पहिल्या वेळी पीक वाहून गेल्याने दुसऱ्यांदा दुबार पेरणी केली होती. त्यातच वारंवार होत असलेल्या अतिवृष्टीने उर्वरित पीक गेले आहेत. त्यामुळे हिमायतनगर तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून सरसकट मदत देऊन शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढणे अपेक्षित आहे.
आत्तापर्यंत ८५७ मिमी हिमायतनगरचे सरासरी पर्जन्यमान ४७५ मिमी आजपर्यंत अपेक्षित पाऊस ११०८ मिमी प्रत्यक्षातील पाऊस (२२५%) यामुळे नदी नाल्याच्या काठावरील पिके तर खरडून गेलीच मात्र खडकाळ शेतीतील पिकेही सततच्या पावसामुळे पाण्यात असल्याने सोडून जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती यंदा पेरणीसाठी केलेला खर्च निघण्याच्या एवढे देखील पीक हाती लागण्याची शक्यता मावळली आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला आत्महत्येच्या मार्गावर जात असलयाचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या या शेतीपिकांच्या परिस्थितीचे विदारक चित्र आत्महत्येत निर्माण होणार नाही यासाठी तातडीने शासनाने मदतीचा हात देणे गरजेचे आहे.