शेतकऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करून तातडीने अहवाल सादर करण्याची जिल्हाधिकाऱ्यांचे तहसीलदारांना आदेश
मुखेड, रणजित जामखेडकर। मागील ४० दिवसापासून मुखेड तालुक्यात व सबंध महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी होत आहे. जूनच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात मुखेड तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांनी आपली पेरणी पूर्ण केली.पिक कोवळी असतानाच सततचा पाऊस लागला. त्यामुळे खरिपाच्या पेरणीचे अतोनात नुकसान झाले. ही परिस्थिती मुखेड तालुका व नांदेड जिल्ह्यामध्ये बहुतेक सर्व भागात सारखीच आहे. पूर्ण पावसाळ्यात जेवढा पाऊस पडतो तेवढा पाऊस फक्त २५ दिवसातच पडला. परिसरातील सर्व लहान-मोठे तलाव हे जूनच्या अखेरच भरले.एकंदरीत तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी मध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.
सात ऑगस्ट रोजी वर्तमानपत्रांमध्ये जिल्ह्यातील नुकसानीची आकडेवारी प्रकाशित करण्यात आली. आणि ही आकडेवारी पाहून मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना धक्का बसला. कारण जिल्ह्यातील इतर तालुक्यात ३० टक्के ते ५० टक्के पर्यंत पिकांचे नुकसान दाखवण्यात आले होते. परंतु मुखेड तालुक्यात फक्त सहाशे पंधरा हेक्टर शेतीचे नुकसान दाखवण्यात आले. बातमी वाचताच अनेक शेतकरी, विविध संघटनांचे पदाधिकारी व राजकीय पुढारी यांनी महसूल विभागाच्या कामकाजाबद्दल संताप व्यक्त केला. त्यांनी आमदार डॉ.तुषार राठोड यांच्याकडे तक्रार केली.
मुखेडच्या लगतच्या कंधार तालुक्यात व मुखेड विधानसभा मतदारसंघातील पेठवडज व कुरळा सर्कलमध्ये तहसील कार्यालय कंधार यांनी पन्नास टक्के नुकसान झाल्याचे त्यांच्या अहवालात कळवले. त्याच्या लगतचाच भाग असलेल्या जांब सर्कलमध्ये केवळ काही हेक्टर नुकसान झाल्याचे तहसील मखेडने कळवले होते. ही अत्यंत गंभीर बाब होती. आ.डॉ.तुषार राठोड यांनी तात्काळ या गोष्टीची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांच्याकडे तहसील कार्यालय मुखेड यांच्या कामकाजाविषयी तक्रार केली. तातडीने सोमवारी दि.६ ऑगस्ट रोजी तालुक्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात पाठवून नव्याने पंचनामे करून अहवाल देण्यासाठी आदेशित करण्यास सांगितले.
मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा दौरा मंगळवार दि.८ ऑगस्ट रोजी नांदेड येथे होता. त्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तात्काळ पंचनामे करून योग्य अहवाल वरिष्ठ कार्यालयास न पाठवल्यास तहसील कार्यालयातील कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यावर तीव्र स्वरूपाची कार्यवाही करेन असेही सुनावले. त्यानुसार तहसीलदार काशिनाथ पाटील यांनी सोमवारी दुपारी तहसील कार्यालय मुखेड येथे सर्व तलाठी, मंडळ अधिकारी व कृषी विभागातले अधिकारी यांची तातडीची बैठक घेतली. त्या बैठकीत सातत्याच्या पावसाने खरोखरच खरीप पिकाचे नुकसान झाले आहे असा सूर जवळपास सर्वच अधिकाऱ्यांनी काढल्यामुळे या महिन्याच्या अहवालात तालुक्यातील पिकाच्या नुकसानीची टक्केवारी वाढवून देण्यात येईल, जेणेकरून भविष्यामध्ये अतिवृष्टीचे राज्य शासनाचे अनुदान व पिक विमा भेटण्यासाठी शेतकऱ्यांना अडचण येणार नाही असे डॉ.तुषार राठोड यांनी सांगितले. समाज माध्यमावर आता या संबंधाने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होईल असे कोणीही लिहू नये.त्याचबरोबर अधिकाऱ्यांना व नेत्यांना निवेदन देऊन कोणी याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असेही आ. डॉ.तुषार राठोड यांनी सांगितले.