उस्माननगर, माणिक भिसे| कंधार तालुक्यातील नागबर्डी येथे पंचक्रोशीत प्रसिद्ध असे जाज्वल्य, सवाचे श्रद्धास्थान असणारे नागोबा मंदिर आहे. येथे दरवर्षी नागपंचमीच्या शुभदिनी नागोबाची मोठी यात्रा भरत असते. या यात्रेत यंदा हजारो भाविक सहभागी झाले आहेत.
लोहा- कंधार या तालुक्याच्या सीमेलगत हे मंदिर असल्याने याठिकाणी दोन्ही तालुके व जिल्हाभरातून भाविक दर्शनासाठी मोठया संख्येने दाखल होत असतात. मात्र गेली २ वर्ष कोरोना महामारीमुळे यात्रेवर निर्बंध लादण्यात आलेले होते. यंदा कोणतेही निर्बंध नसल्याने यात्रेकरुंमध्ये उत्साह दिसून आला. हजारो यात्रेकरू विविध भागातून येथे आले आहेत. यात्रेसाठी व्यापारीही मोठया संख्येने आले आहेत आणि दुकाने लावले आहेत.
२ किलोमीटर परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उस्माननगर पोलिस ठाण्याच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवला आहे. यात्रेच्या अनुषंगाने माजी जिल्हा परिषद सदस्य अँड. विजय धोंडगे यांच्या वतीने रक्तदान शिबिर व महाप्रसाद वाटप करण्यात आले. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांची उपस्थिती होती. तसेच युवा मिल्ट्री अकॅडमीच्या वतीने यात्रेकरूंना पिण्याच्या पाण्याची पाणपोई सुरु करण्यात आली. यावेळी सेवानिवृत्त सुभेदार मेजर गजानन इंपले, परमेश्वर घागरदरे, संतोष शिंदे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.