किनवट, माधव सूर्यवंशी| भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ उपक्रम 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणार आहे. प्रत्येक घरात तिरंगा डौलाने फडकावा यासाठी सर्व नागरिक व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेवून स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करावा तसेच देशप्रेमाचे प्रतिक असलेल्या ह्या उपक्रमात सहभाग घेताना ध्वज संहितेचे पालन करावे असे आवाहन नगराध्यक्ष आनंद मच्छेवार ह्यांनी केले आहे.
हर घर तिरंगा ह्या उपक्रमात सहभाग नोंदविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड ह्यांच्यामार्फत निर्मीत हर घर तिरंगा नांदेड डॉट इन ह्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नागरिकांनी आपल्या सहभागाची नोंदणी करावी. नोंदणी केलेल्या नागरिकांना लवकरच ध्वज उपलब्ध करून दिले जातील अशी माहिती आनंद मच्छेवार ह्यांनी दिली आहे. नागरिक प्ले स्टोरवरून हर घर तिरंगा नांदेड अॅप डाउनलोड सुद्धा करू शकतात. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रम साजरा करताना नागरिकांनी ध्वज संहितेचे पालन करण्याचे आवाहन नगराध्यक्ष मच्छेवार व तहसिलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी मृणाल जाधव केले आहे.
ध्वज संहिता :पुढील प्रमाणे आहे: राष्ट्रध्वज हा हाताने कातलेला किंवा विणलेला अथवा मशीनद्वारे तयार केलेला असावा. सूत, पॉलिस्टर, सिल्क, खादी किंवा लोकरीपासून तयार केलेला तिरंगा चालेल. प्लास्टिक किंवा कागदी झेंडा फडकवू नये. तिरंग्याचा आकार हा आयताकृती असेल व त्याची ठेवण 3:2 हया प्रमाणात असावी. तिरंगा फडकवतना नेहमी झेंड्यातील केशरी रंग हा वरच्या बाजूने आणि हिरवा रंग हा जमिनीच्या बाजूने राहील ह्याची काळजी घ्यावी. यात चूक केल्यास तो तिरंग्याचा अपमान समजण्यात येतो. राष्ट्रीय ध्वज लावताना स्तंभाच्या वरच्या टोकावर लावावा. त्याला स्तंभाच्या खाली, मध्ये किंवा इतरत्र लावू नये. राष्ट्रध्वज लावताना त्यास सजावटी वस्तू लावू नये परंतू केवळ फडकवण्यासाठी त्यात फुले किंवा पाकळ्या टाकण्यास मनाई नाही. राष्ट्रध्वज उतरवाताना पूर्ण सावधानतेने आणि सन्मानाने हळूहळू उतरवावा.
ध्वजावर कोणत्याही प्रकारचे अक्षर चिन्ह लावू नये. तसेच ध्वजस्तंभाच्या वर अथवा आजूबाजूला काहीही लावू नये. ध्वज जमिणीपासून उंचावर लावावा. ध्वज जाणून-बुजून जमिनीवर अथवा पाण्यामध्ये बुडणार नाही अश्या पद्धतीने लावावा. राष्ट्रीय ध्वजाचा वापर व्यवसायाकरता करता येणार नाही तसेच त्याची अवहेलना करणे दंडनीय अपराध आहे. त्यामुळे ध्वजाचा वापर गाडीवर झाकणे, इमारतीवर झाकणे, टेबलवर टेबलक्लॉथप्रमाणे टाकणे, ध्वजाचा कोणत्याही प्रकारचा पोषाखाचा अथवा गणवेशाचा भाग म्हणून वापर करणे, ध्वजाचा रूमाल, उशी किंवा शर्ट आदींवर किंवा कोणत्याही पोशाख साहित्यावर भरतकाम किंवा छपाई करणे चुकीचे आहे.
राष्ट्रध्वज कुठल्याही प्रकारे फाटलेला, मळलेला अथवा चुरगाळलेला लावण्यात येवू नये. तसेच तो एकाच वेळी इतर ध्वजासोबत एकाच काठीवर फडकवू नये. ज्या स्तंभावर राष्ट्रध्वज फडकावयचा आहे त्या काठीवर वा स्तंभावर ध्वजाच्या टोकावर फुले किंवा हार ह्यासारखी कोणतीही वस्तू, बोधचिन्ह ठेवू नये. राष्ट्रध्वजाचा कोणत्याही प्रकारे तोरण, गुच्छ अथवा पताका म्हाणून किंवा अन्य कोणत्याही प्रकारे शोभेसाठी उपयोग करू नये. राष्ट्रीय ध्वज उभारताना तो कोणत्याही प्रकारे फाटणार नाही ह्याची काळजी घ्यावी. आपला राष्ट्रध्वज तिरंगा हा आपला अभिमान व आपली अस्मिता आहे. त्याचा कुठल्याही प्रकारे अनादर होईल असे कृत्य करू नये. स्वातंत्र्याच्या ह्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा ध्वज फडकवावा व तिरंगा ध्वजासोबत आपला फोटो काढून हर घर तिरंगा नांदेड डॉट इन ह्या संकेतस्थळावर किंवा अॅपवरून अपलोड करावा असे आवाहनही नगराध्यक्ष आनंद मच्छेवार ह्यांनी केले आहे.