राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी, नुकसान भरपाईपोटी जिरायतीला हेक्टरी ७५ हजार तर बागायतीला १.५ लाख रुपये द्या -NNL

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारीत कार्यकारिणीच्या बैठकीत ठराव.


मुंबई|
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईपोटी बागायती जमीन व फळबागेसाठी हेक्टरी १.५ लाख रुपये तर जिरायतीसाठी हेक्टरी ७५ हजार रुपये द्यावेत असा ठराव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारीत कार्यकारिणीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडला.

या ठरावाला विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी अनुमोदन दिले आणि ठराव एकमताने पास करण्यात आला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात ही बैठक पार पडली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रदेश कार्याध्यक्ष, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, आ. कुणाल पाटील, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, हुसेन दलवाई, आ. अमर राजूरकर, आ. वजाहत मिर्झा, AICC चे सचिव व सहप्रभारी सोनल पटेल, आशिष दुआ, उपाध्यक्ष मोहन जोशी, भा. ई. नगराळे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे, सोशल मीडियाचे राज्य प्रमुख विशाल मुत्तेमवार आदी उपस्थित होते.

याच बैठकीत गुजरातमधील बिल्किस बानो या महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ११ जणांची शिक्षा गुजरात सरकारने माफ केली व सुटका झाल्यानंतर त्यांचे स्वागत करुन मिठाई वाटण्यात आली. या घटनेचा निषेध करणारा ठरावही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडला, बाळासाहेब थोरात यांनी त्यास अनुमोदन दिले व ठराव एकमताने पास करण्यात आला.

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई गगणाला भिडली असून सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. महागाई प्रश्नी केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसने अनेक आंदोलने केली पण सरकारला जाग येत नाही. आता महागाई प्रश्नी दिल्लीत ४ सप्टेंबर रोजी काँग्रेसची रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन केंद्रातील भाजपा सरकारचा निषेध करावा, असे आवाहनही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी केले आहे.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी