पुणे| बरीच वर्ष झाली लग्नानंतर मूल होत नाहीत, त्यामुळे घरामध्ये सुख-शांती लाभत नाही. यावर उपाय म्हणून अघोरी कृत्य करण्यास भाग पाडणाऱ्या मांत्रिकास भारती विद्यापीठ पोलिसांनी गजाआड केलं आहे. त्याला कोल्हापुरातील इचलकरंजी येथून ताब्यात घेण्यात आले असून, याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात भादंवि कलम ४९८ (अ), ३२३, ५०४, ४२०, ४०६, ३४ सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३ (१), ३ (२), ३ (३) अन्वये गुन्हा पती शिवराज कोरटकर (३६), सासरे राजेंद्र कोरटकर (६४), सासू चित्ररेखा कोरटकर (६२) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. मौलाना बाबा जमदार (रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) असे अटक केलेल्या मांत्रिकाचे नाव आहे.
याप्रकरणी विवाहित महिलेने तक्रार दिली आहे. मांत्रिकाच्या सांगण्यावरून पीडितेला रायगड येथे नेऊन मुलगा व्हावा, यासाठी सर्वांसमोर आंघोळ करायला लावली. यानंतरही पीडितेला वारंवार मारहाण करण्यात आली. त्यानुसार तपास पथकाचे अधिकारी पोलिस उपनिरीक्षक नितीन शिंदे, कर्मचारी रवींद्र चिप्पा व आशिष गायकवाड यांनी ही कारवाई केली.
